अजित पवारांची रिक्त जागा भरण्यासाठी हालचालींना वेग; बारामती पोटनिवडणुकीसाठी वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 10:31 IST2026-02-07T10:29:24+5:302026-02-07T10:31:42+5:30

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Baramati By election Momentum Grows to Fill Vacancy Left by Ajit Pawar Special Voter Drive Announced | अजित पवारांची रिक्त जागा भरण्यासाठी हालचालींना वेग; बारामती पोटनिवडणुकीसाठी वेळापत्रक जाहीर

अजित पवारांची रिक्त जागा भरण्यासाठी हालचालींना वेग; बारामती पोटनिवडणुकीसाठी वेळापत्रक जाहीर

Ajit Pawar Baramati By-Election: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील धक्कादायक निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. या मतदारसंघातील पोटनिवडणूक घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कंबर कसली असून, निवडणुकीपूर्वीची सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजेच विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम प्रशासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी आयोगाने कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ अन्वये ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करणे हा आहे. ज्या नागरिकांची नावे १ जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणीकृत आहेत, तेच या आगामी पोटनिवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील.

महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ही प्रक्रिया पार पडणार आहे. यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर ९ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नागरिक आपली नावे नोंदवू शकतात किंवा यादीतील त्रुटींबाबत दावे व हरकती सादर करू शकतात. ६ मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या सर्व हरकतींची छाननी करून त्या निकाली काढण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. तर १० मार्च रोजी बारामती मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. ही अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच बारामतीमध्ये प्रत्यक्ष मतदानाची तारीख जाहीर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

राजकीय पार्श्वभूमी

२८ जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. या घटनेनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले. गेल्या कित्येक वर्षांपासून बारामतीकर अजित पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देत होते. मात्र त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या आणि बारामतीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. दुसरीकडे आता सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूकही लढवावी अशी मागणी केली जात आहे. 

पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांसोबत बैठकांचे सत्र सुरू होणार असून, त्यात मतदान केंद्रांची पुनर्रचना आणि मतदार नोंदणीबाबत चर्चा केली जाईल. प्रशासनाने मतदारांना आवाहन केले आहे की, ज्यांचे नाव अद्याप यादीत नाही किंवा ज्यात दुरुस्ती हवी आहे, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
 

Web Title : अजित पवार के निधन के बाद बारामती उपचुनाव घोषित; कार्यक्रम जारी।

Web Summary : अजित पवार के निधन के बाद, बारामती उपचुनाव की घोषणा की गई है। मतदाता सूची अपडेट जारी हैं, अंतिम सूची 10 मार्च को। सुनेत्रा पवार उम्मीदवार हो सकती हैं।

Web Title : Baramati by-election announced after Ajit Pawar's death; schedule released.

Web Summary : Following Ajit Pawar's death, the Baramati by-election schedule is announced. Voter list updates are underway, with final list on March 10. Sunetra Pawar is likely to be the candidate.