बंडू आंदेकरने अपक्ष म्हणून सादर केलेला अर्ज अर्धवटच; निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 20:51 IST2025-12-27T20:50:42+5:302025-12-27T20:51:37+5:30
बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर, तसेच सोनाली वनराज आंदेकर हे पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते

बंडू आंदेकरने अपक्ष म्हणून सादर केलेला अर्ज अर्धवटच; निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला नाही
पुणे : हातात बेड्या आणि गळ्यात दोरखंड असलेल्या स्थितीत कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर मोठमोठ्या आवाजात घोषणाबाजी करीत महापालिका निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करायला गेला खरा; मात्र अर्ज अर्धवट असल्यामुळे तो भरूनच घेतला नाही. सोमवारी आता (दि. २९) पुन्हा आंदेकर अर्ज भरणार असल्याचे कळते.
आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. विशेष न्यायालयाने बंडू आंदेकर, तसेच त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, अर्ज दाखल करताना कोणतीही मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने स्पष्ट मनाई केली आहे. तरीही उमेदवारी अर्ज भरायला जाताना बंडू आंदेकर याने ‘नेकी का काम, आंदेकर का नाम’, ‘बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय’, ‘आंदेकरांना मत म्हणजे विकासकामाला मत’, ‘मी उमेदवार आहे दरोडेखोर नाही’, ‘वनराज आंदेकर जिंदाबाद’, अशा घोषणा देत कार्यालयात प्रवेश केला. दरम्यान, बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर, तसेच सोनाली वनराज आंदेकर हे शनिवारी पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज हा अर्धवट भरलेला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. अर्ज भरण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदत असून, या कालावधीत ते पुन्हा अर्ज भरू शकतात, असे भवानी पेठे क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी सांगितले.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयुष कोमकरच्या आई संजीवनी कोमकर यांनी माध्यमांशी बोलताना आंदेकर कुटुंबीयांना कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी कळकळीची विनंती केली होती. ‘जर आम्हाला न्याय देता येत नसेल, तर किमान अन्याय तरी करू नका. माझ्या लहान मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आले आहे. सत्ता होती म्हणून त्यांनी आजवर सर्व काही केले. कृपया त्यांना निवडणुकीचे तिकीट देऊ नका,’ असे त्या म्हणाल्या होत्या. तसेच, जो पक्ष आंदेकरांना तिकीट देईल, त्या पक्षाच्या कार्यालयासमोर जाऊन मी आत्मदहन करेन. मला माझ्या गोविंदाला न्याय हवा आहे. एवढेच मला पाहिजे, अशी भावनिक प्रतिक्रिया संजीवनी कोमकर यांनी व्यक्त केली होती.