पुण्यात आगळावेगळा उपक्रम "हक्क बजवा अन् पुस्तक भेट मिळवा", दीड हजार मतदारांनी घेतला लाभ
By श्रीकिशन काळे | Updated: November 20, 2024 18:25 IST2024-11-20T18:24:23+5:302024-11-20T18:25:09+5:30
पुण्यातील मंडळाकडून केलेल्या उपक्रमात धार्मिक, प्रवास वर्णन, ग्रंथ, पाककृती, ऐतिहासिक, प्रेरणादायी पुस्तकांचा समावेश

पुण्यात आगळावेगळा उपक्रम "हक्क बजवा अन् पुस्तक भेट मिळवा", दीड हजार मतदारांनी घेतला लाभ
पुणे: ‘‘मतदानाचा हक्क बजवा आणि पुस्तक भेट मिळवा, असा आगळावेगळा उपक्रम बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट, नारायण पेठेतील माती गणपती व संयुक्त प्रसाद मित्र मंडळ यांनी मंगळवारी राबवला. तब्बल दीड हजार मतदारांनी याचा लाभ घेतला.
मतदानाचा टक्का वाढावा, वाचन संस्कृती रुजावी या विधायक हेतूने कसबा मतदार संघातील नागरिकांनी अधिकाधिक मतदान करावे आणि आपला मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, मतदान केलेल्या मतदारांनी बोटावरची शाई दाखवली आणि सुमारे पंधराशे मतदारांना पुस्तके भेट दिली. त्यामध्ये विविध धार्मिक, प्रवास वर्णन, ग्रंथ, पाककृती, ऐतिहासिक, प्रेरणादायी पुस्तकांचा समावेश होत. त्याकरता सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेमध्ये ज्या मतदारांनी मतदान केले, त्यांना पुस्तक भेट देण्यात आली. मतदानाचे दायित्व सर्वांनी पार पाडावे, त्याचबरोबर मराठी पुस्तकाचे वाचन करावे आणि वाचन संस्कृती रुजावी याकरता या उपक्रमाचे आयोजन केले होते, असे साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा यांनी सांगितले. संयुक्त प्रसाद मित्र मंडळाचे अध्यक्ष अजित परांजपे अनिल मोहिते, माती गणपती मित्र मंडळाचे अध्यक्ष परेश हराळे, कौस्तुभ खाकुर्डीकर , साईनाथ मंडळ ट्रस्टचे प्रशांत पंडित अमित दासानी, संकेत निंबळकर कार्यकर्त्यांनी या विधायक उपक्रमाचे आयोजन केले होते.