Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 21:40 IST2026-04-05T21:37:59+5:302026-04-05T21:40:38+5:30
Akash More Baramati By election 2026: बारामती विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. दिल्लीतूनच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Baramati by election 2026: पोटनिवडणूक लढवणार असल्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसने रविवारी (५ एप्रिल) आपला उमेदवार जाहीर केला. सुनेत्रा पवारांविरोधातकाँग्रेसकडून आकाश मोरे निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. बारामतीत पोटनिवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवारांनीही अर्ज भरले आहेत, मात्र मोरे विरुद्ध पवार यांच्यातच थेट लढत होताना दिसत आहे. पण, काँग्रेसने उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण आहेत? आकाश मोरे यांनी यापूर्वीही बारामतीतून निवडणूक लढवली आहे. त्यावेळी अजित पवार जिंकले होते.
बारामतीत बिनविरोध निवडणूक करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उद्धवसेनेने निवडणूक न लढवण्याची भूमिका घेत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, काँग्रेसने निवडणुकीत उडी घेतली आहे. यापूर्वी पक्षाकडून निवडणूक लढवलेल्या कार्यकर्त्यालाच काँग्रेसने या निवडणुकीत उतरवले आहे.
आकाश मोरे कोण आहेत?
सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आकाश मोरे यांना उमेदवार देत काँग्रेसने पोटनिवडणुकीत बारामतीत धनगर कार्ड खेळले आहे. मोरे धनगर समाजातून येतात. बारामतीत धनगर मतदार निर्णायक राहिलेला आहे.
आकाश मोरे हे काँग्रेसचे पदाधिकारी असून, पेशाने वकील आहेत. आकाश मोरे यांचे वडील विजय मोरे हे माजी आमदार होते. त्यांनी विधान परिषदेत काम केले आहे. आकाश मोरे हेही राजकीय जीवनात सक्रीय असून, त्यांनी २०१४ मध्ये निवडणूक लढवली होती.
आकाश मोरे यांना काँग्रेसने २०१४ मध्ये उमेदवारी दिली होती. त्यावेळी चारही प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्र लढले होते. बारामती विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत अजित पवार विजय झाले होते. या निवडणुकीत आकाश मोरे यांना ४ हजार १३ मते मिळाली होती. शिवसेनेच्या राजेंद्र काळे यांना ४ हजार ८६, भाजपाच्या बाळासाहेब गवाडे यांना ६० हजार ७९७ मते मिळाली होती. तर अजित पवार यांना १,५०,५८८ मते मिळाली होती.
सुनेत्रा पवारांविरोधात आता काय होणार?
आकाश मोरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असली, तरी ज्या राजकीय पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे, त्यात आकाश मोरे यांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्युमुळे सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी सहानुभूती आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या दोन्ही मित्रपक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे.