Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 21:33 IST2026-01-13T21:32:16+5:302026-01-13T21:33:38+5:30
Ajit Pawar Naresh Arora: महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयात झाडाझडती घेतली.

Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार असलेले नरेश अरोरा हे अचानक चर्चेत आले. राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. कारण नरेश अरोरा प्रमुख असलेल्या डिझाईन बॉक्स कंपनीच्या कार्यालयात पोलीस पोहोचले. क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात कागदपत्रांची तपासणी केली. महापालिका निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर लगेच झालेल्या या कारवाईने खळबळ उडाली. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सविस्तर भूमिका मांडली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्यरत असलेले नरेश अरोरा व त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पुणे कार्यालयात आज क्राईम ब्रँचचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशाने उपस्थित झाले होते."
"संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती माहिती देण्यात आली असून संपूर्ण सहकार्य करण्यात आले. या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्पष्ट करू इच्छितो की, या संपूर्ण विषयात पक्ष हा नरेश अरोड़ा व त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे", अशी भूमिका अजित पवारांनी या झाडाझडतीनंतर मांडली.
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायद्याचा सन्मान करतो आणि सर्व वैधानिक प्रक्रियांना सहकार्य करण्यावर विश्वास ठेवतो. या प्रकरणातही संबंधित यंत्रणांना आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्यात आले आहे", असेही अजित पवारांनी म्हटले आहे.
"या विषयावर कोणताही संभ्रम, अफवा किंवा अनावश्यक नरेटिव्ह पसरवू नये, असे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो. तथ्यांच्या आधारेच कोणताही निष्कर्ष काढावा, हीच आमची भूमिका आहे. या संपूर्ण विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयम, जबाबदारी आणि स्पष्टतेसह आपली भूमिका मांडत आहे", अशी माहिती अजित पवारांनी दिली.