सण-उत्सवात भेसळीचा चांगलाच धंदा; गणेशोत्सवात १४ लाखांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 14:45 IST2024-09-21T14:44:26+5:302024-09-21T14:45:21+5:30
एफडीएच्या पथकाने पुणे शहर, तसेच जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली असून या कारवाईत भेसळयुक्त तूप, बटर, पनीर, खवा, मिठाई असे खाद्यपदार्थ जप्त केले

सण-उत्सवात भेसळीचा चांगलाच धंदा; गणेशोत्सवात १४ लाखांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त
पुणे : गणेशोत्सवात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शहर, तसेच जिल्ह्यात कारवाई करून १४ लाख ३५ हजार रुपयांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त केले. त्यामुळे सण-वार आले की भेसळीचा धंदा चांगलाच जोरात चालतो, हे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.
गणेशोत्सवात भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याने एफडीएने पथके तयार केली होती. एफडीएच्या पथकाने पुणे शहर, तसेच जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत भेसळयुक्त तूप, बटर, पनीर, खवा, मिठाई असे खाद्यपदार्थ जप्त केले. पुणे जिल्ह्यात करण्यात आलेल्या कारवाईत पाच लाख १६ हजार रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले, तसेच शहर परिसरातून नऊ लाख १९ हजार रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले, अशी माहिती सहआयुक्त सु. ग. अन्नपुरे यांनी दिली.
पुणे विभागात भेसळीच्या संशयावरून १०१ विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांचे नमुने ताब्यात घेण्यात आले. एफडीएने ११७ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेेतले असून, विश्लेषणानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री होत असल्यास नागरिकांनी त्वरित टोल फ्री क्रमांकावर (१८००२२२३६५) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.