"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 19:29 IST2024-10-09T19:28:02+5:302024-10-09T19:29:09+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातरांचे वारे वाहू लागले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छिणारांची संख्या मोठी दिसत आहे. त्यामुळे नाराजी वाढण्याची चिन्हे आहेत, याबद्दल रोहित पवार काय म्हणाले?

"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
Maharashtra Vidhan Sabha 2024: लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच भाजपातूनही काही नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे, पण तिकीट कोणाला मिळणार, याबद्दल एक चर्चा होत आहे. रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून किती आयात नेत्यांना उमेदवारी दिली जाणार याबद्दल भाष्य केले.
रोहित पवार म्हणाले, "1600 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. उमेदवार तोडीस तोड आहेत. पवार साहेब लोकांना ओळखतात. महाराष्ट्राला ओळखतात. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पवार साहेबांकडे येण्याचा ओढा खूप मोठ्या प्रमाणात आहे", असे सांगतानाचा १४ तारखेला प्रवेश होईल, असे ते रामराजेंचा उल्लेख न करता म्हणाले.
आमदार रोहित पवार पुढे म्हणाले, "येत्या काळात भाजपाचे काही नेत्या आमच्या पक्षात प्रवेश करतील. जे काही माणसं जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांना भेटले आहेत, ते सगळे प्रवेश करताना बघायला मिळतील."
"अनेक लोक इच्छुक आहेत. पण शरद पवार साहेब स्वतः म्हणताहेत की, आपल्याला सगळीकडे काही आयात उमेदवार चालणार नाही. ठराविक ठिकाणी, त्यांचा टक्काही कमी असेल. पण, बहुतांश ठिकाणी निष्ठावंतांना संधी दिली पाहिजे", असेही रोहित पवारांनी यावेळी सांगितले.
"२८८ मतदारसंघ आहेत, आता आमच्या पक्षाला किती जागा येतील हे आज सांगता येणार नाही. काही जागा असतील, मला असं वाटतं की, १० टक्क्यांच्या पुढे आयात उमेदवार दिले जाणार नाही. ९० टक्के निष्ठावंतच लोक असतील. ठराविक ठिकाणी नाराजी होईल, पण पवार साहेब त्यांच्याशी संवाद साधून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतील", अशी माहिती रोहित पवारांनी दिली.