"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 00:13 IST2024-10-17T00:09:41+5:302024-10-17T00:13:38+5:30
Sharad pawar Jayant Patil : महाविकास आघाडीचे सरकार आल्यास नेतृत्व कोण करणार? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अशाच शरद पवारांनी इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांवर मोठी जबाबदारी देण्याबद्दल सूचक विधान केले आहे.

"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
Sharad Pawar Jayant Patil Maharashtra Vidhan Sabha 2024: "महाराष्ट्र सांभाळण्याचा आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची दृष्टी, शक्ती ही ज्यांच्यामध्ये आहे, असे आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि नेते जयंत पाटील", असे म्हणत शरद पवारांनी इस्लामपुरात सूचक विधान केले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास जयंत पाटलांकडे महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार, अशा आशयाने या विधानाबद्दल चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिव स्वराज्य यात्रेचा समारोप इस्लापुरात झाला. या सभेत जयंत पाटील भाषणाला उभे राहिले, तेव्हा उपस्थितांनी त्यांच्या नावाने मुख्यमंत्रिपदाच्या घोषणा दिल्या. जयंत पाटलांनी सगळ्यांना शांत बसायला सांगितलं.
"अशा घोषणा देऊन कुणी मुख्यमंत्री होत नाही. त्याला लय उठाबशा काढाव्या लागतात. तुम्ही गप्प बसा आता...", असे जयंत पाटील म्हणाले.
शरद पवारांचे जयंत पाटलांबद्दल सूचक विधान काय?
सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, "मला एका गोष्टीचा आनंद आहे की, हे सगळं काम करण्यासाठी आज जयंतराव ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताहेत. काम करताहेत. कष्ट करताहेत. लोकांना विश्वास देताहेत. दिलासा देताहेत. त्यांच्या प्रयत्नांच्या पाठीशी महाराष्ट्राची तरुण पिढी एका विचाराने निश्चित पुढे जाईल", असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.
"मला आनंद आहे की, आजच्या पिढीच्या जयंतरावसारख्या नेतृत्वाने उद्याचा महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी, सावरण्यासाठी भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी. ही तुमची, माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेच्या पूर्ततेला तुम्हा सगळ्यांची शक्ती असेल", असे शरद पवार म्हणाले.
"उद्याचा महाराष्ट्र घडवण्याचे काम येथून होईल"; जयंत पाटलांबद्दल पवारांचे विधान
"मी एवढंच सांगतो. पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो. देशाचा पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो की, उद्याचा महाराष्ट्र सावरण्यासाठी आणि उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार आहे, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही", असे सांगत शरद पवारांनी सूचक विधान केले.
पुढे पवार म्हणाले, "कारण साखराळे गाव ऐतिहासिक गाव आहे. या गावात साखर कारखाना उभा करण्याचे काम राजाराम बापूंनी केलं होतं. याच साखराळे गावात आपण जमतोय. यामधून याच भागातील सुपुत्राच्या हातामध्ये महाराष्ट्र उभारण्याची, महाराष्ट्र सावरण्याची आणि महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकतोय. मी आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे सर्व सहकारी, महाराष्ट्रातील तरुण पिढी शक्ती त्यांच्या पाठीशी राहिली, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो", अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.