राहुल गांधींची लोकप्रियता केरळात काँग्रेसला तारेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 04:22 AM2019-04-21T04:22:29+5:302019-04-21T04:23:14+5:30

डाव्यांची दमछाक सुरूच; भारतीय जनता पक्षाची या खेपेस पुन्हा परीक्षा

Rahul Gandhi's popularity will save Congress? | राहुल गांधींची लोकप्रियता केरळात काँग्रेसला तारेल?

राहुल गांधींची लोकप्रियता केरळात काँग्रेसला तारेल?

googlenewsNext

- पोपट पवार 

तिरूअनंतपूरम: शबरीमाला मुद्द्यावरून विरोधकांनी डाव्या आघाडीला कोंडीत पकडले असतानाच, राहुल गांधी यांनीही केरळमधूनच लढण्याचा घेतलेला निर्णय काँग्रेसला लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. मल्याळी जनतेमध्ये सर्वाधिक लोकप्रियतेच्या यादीत राहुल गांधी यांनी स्थान पटकाविले आहे.

मंगळवारी केरळच्या २० जागांसाठी मतदान होणार आहे. शबरीमाला आंदोलन, कार्यकर्त्यांवरील हल्ले, धार्मिक धुव्रीकरण या मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या असल्या तरी स्थानिक प्रश्नांवरही राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी डाव्यांवर निशाना साधला. त्यामुळे दक्षिणेतील हे राज्य पुन्हा डाव्याची सोबत करणार की काँग्रेसला तारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

निवडणुकीत काँग्रेसप्रणित यूडीएफ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एलडीएफ आघाडीत खरा सामना रंगणार आहे. भाजप तिसऱ्या स्थानासाठी धडपडत असला तरी एक-दोन जागांवर भाजपही धक्कादायक निकाल देऊ शकतो. काँग्रेसप्रणित यूडीएफ ने सर्वच्या सर्व २० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये काँग्रेस १६ जागा लढवत असून मित्रपक्ष मुस्लीम लीग २, केरळ काँग्रेस( मणी गट) १, आणि आरएसपीला १ जागा दिली आहे. डाव्यांच्या एलडीएफ नेही २० उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी १४ जागा लढवत आहे. भाकपने ४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. एलडीएएफने दोन अपक्षांना पाठिंबा दिला आहे. डावे व काँग्रेस यांच्या बालेकिल्ल्यात भाजपनेही १५ जागांवर उमेदवार उभे केले असून भारतीय धर्म जन सेनेला ४ जागा सोडल्या आहेत. कधीकाळी राष्ट्रीय राजकारणात किंगमेकरची असलेल्या डाव्या पक्षांची अवस्था फारच वाईट झाली आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा व केरळमध्ये वर्षानुवर्षे सत्ता भोगणाºया डाव्यांचे सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतके खासदार आहेत. केरळमधील हाच त्यांचा आधार आहे.

वायनाड काँग्रेससाठी सोपा
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे वायनाडमधून निवडणूक लढवत असल्याने, या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ही जागा भाजपने भारतीय धर्म जन सेनेला सोडली असून, त्यांनी तुषार वेल्लापल्ली यांना मैदानात उतरवले आहे. एलडीएफच्या वतीने येथे पी.पी. सुन्नीर रिंगणात आहेत. वायनाडमध्ये मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाचे प्राबल्य असून, आदिवासी समाजही मोठा आहे. वायनाड हा काँग्रेसचा गड मानला जातो. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक सोपी मानली जात आहे.

Web Title: Rahul Gandhi's popularity will save Congress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.