lok sabha election Bjp Leader Maneka Gandhi Angry On Her It Cell After Video Of The Statement On Muslims Goes Viral | मुस्लिमांबद्दलच्या विधानानं मेनका अडकल्या; भाजपाच्याच आयटी सेलवर भडकल्या

मुस्लिमांबद्दलच्या विधानानं मेनका अडकल्या; भाजपाच्याच आयटी सेलवर भडकल्या

सुलतानपूर: भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधी मुस्लिम मतदारांबद्दल केलेल्या विधानानं वादात अडकल्या आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोगानं नोटीस बजावल्यानंतर त्या स्वत:च्याच आयटी सेलवर भडकल्या. आमच्या आयटी सेलला काळजी घेण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या. संतापलेल्या मेनका यांनी आयटी सेलची गरज आहे का, असा सवालदेखील उपस्थित केला. 

मी लिहिलेलं वाचून दाखवत नाही. मी जे काही बोलले, ते मनापासून बोलले, असं मेनका गांधींनी म्हटलं. 'मी भाषणं पाठ करून येत नाही. मी प्रचारसभेत त्यांच्याबद्दल (मुस्मिम मतदारांबद्दल) जे बोलले आणि वृत्तवाहिन्यांनी जे दाखवण्यात आलं, ते पूर्णपणे वेगळं होतं. मी अशी नाही. मुस्लिम बांधव आमच्यासोबत यावेत, यासाठी मी पहिल्यापासून प्रयत्न करते आहे,' असं मेनका म्हणाल्या. या प्रकरणात आमच्या आयटी सेलनं काहीच केलं नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

आयटी सेलनं ना माझं भाषण घेतलं ना काही केलं. त्यामुळे अशा आयटी सेलची खरंच गरज आहे का असा प्रश्न मला पाडतो, असा संताप मेनका गांधीनी व्यक्त केला. आयटी सेलवाले दिवसभर फोटो क्लिक करतात. ते फोटो अपलोड करतात. अशा पद्धतीनं निवडणूक होऊ शकत नाही, असं मेनका गांधी म्हणाल्या. मेनका गांधी मुस्लिमांना प्रचारादरम्यान उघडउघड धमकी देत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे त्या वादात सापडल्या. मी निवडणूक जिंकणारच आहे. त्यामुळे मला साथ द्या. अन्यथा उद्या माझ्याकडे एखादं काम घेऊन याल, तेव्हा मी काय करेन ते समजून जा, असं मेनका गांधी यांनी म्हटलं. सुलतानपूरमधील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं. त्याबद्दल निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस पाठवली आहे. 
 

Web Title: lok sabha election Bjp Leader Maneka Gandhi Angry On Her It Cell After Video Of The Statement On Muslims Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.