'CMच्या संकटमोचका'चं आव्हान राज ठाकरे स्वीकारणार?, 'पाणी' पाजणार की पाण्यात पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:53 PM2019-04-17T16:53:53+5:302019-04-17T16:59:23+5:30

'डिजिटल' हरिसालमधल्या बेरोजगार तरुणाला थेट स्टेजवरच आणून राज यांनी 'कल्ला'च केला.

Lok Sabha Election 2019: Will Raj Thackeray accept Girish Mahajan's challenge | 'CMच्या संकटमोचका'चं आव्हान राज ठाकरे स्वीकारणार?, 'पाणी' पाजणार की पाण्यात पडणार?

'CMच्या संकटमोचका'चं आव्हान राज ठाकरे स्वीकारणार?, 'पाणी' पाजणार की पाण्यात पडणार?

Next
ठळक मुद्दे'ए लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरे नरेंद्र-देवेंद्र सरकारची पोलखोल करत आहेत.राज यांनी स्वतःचाच एक आरोप पुराव्याने सिद्ध करून दाखवल्यास राजीनामा द्यायलाही गिरीश महाजन तयार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात युती किंवा आघाडीपेक्षा राज ठाकरेंचं 'इंजिन'च सुस्साट धावतंय. 'ए लाव रे तो व्हिडीओ' म्हणत ते नरेंद्र-देवेंद्र सरकारची पोलखोल करत आहेत. पुरावे देत टीका करण्याचं हे 'राजतंत्र' अनेकांना आवडलंय. अर्थात, हे व्हिडीओ मोडून-तोडून दाखवले जात असल्याचं भाजपा समर्थकांचं म्हणणं आहे. त्यांनाही राज यांनी गप्प करून टाकलं. 'डिजिटल' हरिसालमधल्या बेरोजगार तरुणाला थेट स्टेजवरच आणून राज यांनी 'कल्ला'च केला. पण आता मात्र 'मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक' म्हणून ओळखले जाणारे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय. राज यांनी स्वतःचाच एक आरोप पुराव्याने सिद्ध करून दाखवल्यास राजीनामा द्यायलाही ते तयार आहेत. त्यामुळे आता राज यांची खरी कसोटी असल्याची चर्चा आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेली नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी 'राज'गर्जना होत आहेत. सत्तेत यायच्या आधी आणि आल्यावर मोदींची भाषा कशी बदलली, हे राज ठाकरे व्हिडीओ दाखवून सांगताहेत. तसंच, राज्य सरकारच्या धोरणांवरही टीकेचे बाण सोडत आहेत. नांदेडच्या सभेत राज यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर एक मोठा आरोप केला होता. महाराष्ट्र पाण्यासाठी तहानलेला असताना गोदावरीचं पाणी गुजरातला पळवण्याचा घाट सरकारने घातल्याचं त्यांनी म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'बसवलेला मुख्यमंत्री' असा करत, मोदींपुढे फडणवीसांचं काही चालत नसल्याची बोचरी टिप्पणीही त्यांनी केली होती. 

राज यांच्या या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी गुजरातला देण्याचा करार २०१० साली तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता, तो आपण रद्द केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. राज ठाकरेंनी अभ्यास करून बोलावं, असंही सुनावलं होतं. मात्र आता गिरीश महाजन यांनी राजना खुलं आव्हानच दिलंय. 

महाराष्ट्राचं पाणी गुजरातला जात असल्याचं राज ठाकरेंनी सिद्ध केल्यास मी राजीनामा देईन, असं महाजन यांनी जाहीर केलंय. नुसतं बोलून चालणार नाही, तर स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं पाहिजे. अन्यथा नुसत्या नकला करायच्या. क्लिप दाखवायच्या, तोडून-मोडून मोदींच्या काहीतरी आणि दोन शब्द बोलायचं. असं करण्यापेक्षा,  दुसऱ्यांच्या सुपाऱ्या घेण्यापेक्षा आपली माणसं निवडून आणून दाखवा, असा टोलेही त्यांनी हाणले. त्यामुळे आता महाराष्ट्राचं पाणी गुजरातला जात असल्याचे पुरावे राज ठाकरे देतात का, की पुरावे देऊ न शकल्यानं त्यांचीच कोंडी होते, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 

राज ठाकरे यांची आज साताऱ्यात जाहीर सभा आहे. कुठला नवा मुद्दा आणि व्हिडीओ घेऊन ते स्टेजवर येतात, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्याचवेळी, गिरीश महाजनांच्या आव्हानावर ते काही बोलतात का, कोण कुणाला पाणी पाजतो, हे पाहावं लागेल.  

Web Title: Lok Sabha Election 2019: Will Raj Thackeray accept Girish Mahajan's challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.