.... म्हणून तर पर्यावरण मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली नाही?; भाजप नेत्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 20:24 IST2021-03-24T20:21:55+5:302021-03-24T20:24:56+5:30
कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, कर प्रत्यक्षात फक्त काही लाखात वसूल झाला असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.

.... म्हणून तर पर्यावरण मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली नाही?; भाजप नेत्याची टीका
गेल्या काही दिवसांपासून राज्यात १०० कोटींच्या खंडणीचा मुद्दा गाजत असताना मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे.
"आदित्य ठाकरेंच्यावरळी मतदारसंघात मालमत्ता कर वसुलीत १०० कोटींची तफावत असल्याचा काँग्रेसने 'घरचा आहेर' दिला असल्यामुळे तर पर्यावरण मंत्र्यांना कोविडची लागण झाली नाही ना?," असा सवाल करत भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली.
काय आहे विषय?
मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने तीव्र कारवाई सुरू केली आहे. जी दक्षिण विभागातील वरळी, परळ या भागात अनेक ठिकाणी मिलच्या मोक्याच्या व व्यावसायिक जागा आहेत. या मिल मालकांकडून मालमत्ता करापोटी महापालिकेला कोट्यवधी रुपये येणे आहे. मात्र अधिकारी मालमत्ता कर आकारणी करताना व त्यांची देयके संबंधित जागा मालकांना पाठवताना त्यांच्या जागेचे आकारमान व त्यांचे मूल्य कमी दाखवतात. त्यामुळे त्यांचा मालमत्ता कर हा काही कोटींऐवजी काही लाखांत आकारला जातो. याचा मोठा आर्थिक फटका पालिकेला बसत असून संबंधित पालिका अधिकारी गब्बर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
वरळी भागात मालमत्ता कर वसुलीत १०० कोटींचा, तर संपूर्ण मुंबईत ७०० ते ८०० कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा दावा रवी राजा यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे. जागा मालक, पालिका अधिकारी यांच्या संगनमताने हा ७००-८०० कोटींचा मालमत्ता कर वसूली घोटाळा झाला असून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, कर प्रत्यक्षात फक्त काही लाखात वसूल झाला असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.
राज्यात शिवसेनेबरोबर सत्तेत असतानाही महापालिकेत मात्र काँग्रेसने शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेचा प्रशासनावर अंकुशच राहिलेला नाही, त्यामुळे कर्मचारी असे घोटाळे करीत आहेत. पालिकेत चांगले काही काम झाले तर त्याचे श्रेय स्वतः घेतात, स्वतःची पाठ थोपटतात. त्याप्रमाणे ही जबाबदारीही सत्ताधाऱ्यांचीच आहे. विरोधी पक्षात असल्याने मुंबईकरांच्या भल्यासाठी असे भ्रष्टाचार उकरून काढतच राहू, असा इशारा देखील रवी राजा यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.