Pimpri Chinchwad : महापालिकेत यंग ब्रिगेडचा बोलबाला; नगरसेवकांचे सरासरी वय ४५ वर्षे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:11 IST2026-01-30T16:10:39+5:302026-01-30T16:11:00+5:30
- नव्या सभागृहात २१ ते ४९ या वयोगटातील ६८.७५ टक्के नगरसेवक; युवा पिढीसोबतच अनुभवी ज्येष्ठांचा साधला जाणार समतोल, तब्बल तीन वर्षांनी नगरसेवकांचा सभागृहात होणार प्रवेश

Pimpri Chinchwad : महापालिकेत यंग ब्रिगेडचा बोलबाला; नगरसेवकांचे सरासरी वय ४५ वर्षे
- आकाश झगडे
पिंपरी : महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी तरुणांसह ज्येष्ठ अनुभवी सदस्यांची निवड केली आहे. सभागृहात अनुभवी आणि तरुण अशा दोन्ही पिढ्यांचा समतोल दिसून येतो. १२८ नगरसेवकांच्या सभागृहात सदस्यांचे सरासरी आयुर्मान ४५ वर्षे असून, तरुणाईचा बोलबाला असणार आहे.
शहरात सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करताना ज्येष्ठ, अनुभवी सदस्यांसह तरुणांनाही पसंती दिली होती. प्रभाग ३० मधील प्रतीक्षा लांघी-जवळकर या २३ वर्षाच्या सर्वात तरुण नगरसेविका ठरल्या आहेत. दीप्ती कांबळे यांचे वय २४ वर्षे असून, यश साने व सिद्धार्थ बनसोडे हे दोघे २५ वर्षांचे तरुणही विजयी झाले आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या नव्या सभागृहातून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तरुण नगरसेवकांकडून आधुनिक दृष्टिकोन, नव्या संकल्पना, गतिमान कामकाजाची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच अनुभवी सदस्यांच्या मार्गदर्शनामुळे निर्णयप्रक्रियेत स्थैर्य येईल. विकासकामे, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष केंद्रीत राहील, अशी अपेक्षा आहे.
-------
तरुणाईचा उत्साह आणि जुन्यांच्या अनुभवाचा समन्वय
तरुणाईचा उत्साह आणि अनुभवी सदस्यांचा अनुभव यांचा समन्वय साधत महापालिकेचे कामकाज अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. नागरिकांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देणे, पारदर्शक प्रशासन आणि जबाबदार कारभार याकडे नव्या सभागृहाचे लक्ष राहणार आहे.
------
वयोगटानुसार अशी आहे आकडेवारी
२१ ते २९ वयोगटातील आठ जणांनी यश मिळविले आहे. ३० ते ३९ मधील २९ आणि ४० ते ४९ वयोगटातील सर्वाधिक ५१ नगरसेवक निवडून आले आहेत. २१ ते ४९ या वयोगटात ६८.७५ टक्के नगसेवक आहेत, यामुळे सभागृहात तरुणाईची संख्या मोठी आहे. ५० ते ५९ या वयोगटातील ३३ नगरसेवक जिंकले आहेत. साठ वर्षांच्या पुढील सात ज्येष्ठ सदस्य दिसणार आहेत.
-----
सभागृहात तिशीच्या आतील आठ नगरसेवक
मागील निवडणुकीमध्येही अनेक तरुण सदस्यांना संधी मिळाली होती. परंतु, त्यातील अनेकांनी सभागृहात फारसा प्रभाव टाकला नव्हता. अनेकवेळा चर्चेमध्ये ज्येष्ठ नगरसेवकच जास्त वेळ भाग घेतात. आता सभागृहात आठ नगरसेवक तिशीच्या आतील आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पक्षांचे नगरसेवक एकत्र येऊन काम करतील, अशी अपेक्षा पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
-----
वयोमानानुसार नगरसेवक
वयोगट संख्या टक्केवारी
२१ ते २९ ०८ ६.२५%
३० ते ३० २९ २२.६५%
४० ते ४९ ५१ ३९.८५%
५० ते ५९ ३३ २५.७८%
६० च्या पुढे ७ ५.४७%
------
सर्वांत तरुण नगरसेवक
नाव वय
प्रतीक्षा लांघी-जवळकर २३
दीप्ती कांबळे २४
यश साने २५
सिद्धार्थ बनसोडे २५
शिवानी नरळे २८
अर्चना कारंडे २८
ऐश्वर्या तरस २९
--------
सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक
नाव वय
अनुराधा गोरखे ६८
हिराबाई घुले ६६
शैलजा मोरे ६५
स्वाती काटे ६५
सविता आसवानी ६२
योगेश बहल ६२
कृष्णा सुरकुले ६१
------