Pimpri-Chinchwad : सस्पेन्स कायम..! स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 15:47 IST2026-02-03T15:45:44+5:302026-02-03T15:47:02+5:30
- तीनही विधानसभा मतदारसंघांना प्रत्येकी एक पद; स्थायीसाठी कोणाचे पारडे जड

Pimpri-Chinchwad : सस्पेन्स कायम..! स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार ?
पिंपरी : महापालिकेतील सत्तावाटप जवळपास स्पष्ट झाले असले, तरी स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत सस्पेन्स कायम आहे. सत्तारूढ पक्षनेत्याची जबाबदारी प्रशांत शितोळे यांच्याकडे सोपविली असून, ते चिंचवड विधानसभा मतदारसंघातून येतात.
महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले रवी लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेल्या शर्मिला बाबर या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून येतात. त्यामुळे भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या तीनही विधानसभा मतदारसंघांना प्रत्येकी एक महत्त्वाचे पद दिल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर आता महापालिकेतील सर्वाधिक महत्त्वाची समजली जाणारी स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्थिक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या पदासाठी कोणाची निवड होते, यावर आगामी काळातील विकासकामांची दिशा ठरणार असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
तीनही मतदारसंघांचा समतोल साधण्याचा प्रयत्न झाल्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्षपद चौथ्या नेतृत्वाला दिले जाणार की, याच तिन्ही मतदारसंघांपैकी एखाद्यालाच पुन्हा एक अतिरिक्त जबाबदारी दिली जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा पुढील निर्णय कोणता असेल, याकडे महापालिकेतील सर्वांची नजर लागली आहे.