PCMC Election 2026: शहरातील शिवसेनेचा मतदार कोणत्या गटासोबत? शिवसैनिकांची उद्धवसेना व शिंदेसेनेत विभागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:12 IST2025-12-30T15:06:50+5:302025-12-30T15:12:17+5:30
Pimpri Chinchwad Municipal Election 2026: यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि उद्धवसेनेचे काय होणार, याबाबत उत्सुकता आहे.

PCMC Election 2026: शहरातील शिवसेनेचा मतदार कोणत्या गटासोबत? शिवसैनिकांची उद्धवसेना व शिंदेसेनेत विभागणी
- रवींद्र जगधने
पिंपरी : शहरात शिवसेनेला मानणाराही मतदार असून २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीत १४, तर २०१७ मध्ये ९ नगरसेवक निवडून आले होते. मावळ लोकसभा मतदारसंघात खासदारही शिवसेनेचेच आहेत. मात्र, २०२२ नंतर शिवसेनेची उद्धवसेना व शिंदेसेनेत विभागणी झाली. यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि उद्धवसेनेचे काय होणार, याबाबत उत्सुकता आहे.
शहरात शिवसेनेची पायाभरणी घरमालक व भाडेकरू यांच्या वादातून झाली. नळावर पाणी भरण्याच्या वादातून घरमालकाने भाडेकरूला मारहाण केली. त्यामुळे सर्वसामान्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ३१ ऑक्टोबर १९७४ मध्ये काळभोरनगर येथे १६ शिवसैनिकांनी पुण्यातील ॲड. नंदू घाटे, रमेश बोलके व इतरांच्या माध्यमातून शिवसेनेच्या पहिल्या शाखेची स्थापना केली. त्यामध्ये माजी खासदार गजानन बाबर, हनुमंत बनकर, जयवंत हगीर, रवींद्र सावंत, मधुकर बाबर, प्रकाश बाबर, धनंजय सावंत, गुंजार सावंत, साहेबराव बेडसे, शिवाजी तोडकर, भानुदास कामठे आदींचा समावेश होता. पहिले शाखाप्रमुख म्हणून हनुमंत बनकर यांची निवड करण्यात आली. त्यांचे आकुर्डीत सेनाभवनच्या खाली सायकलचे दुकान आहे. त्यानंतर शहरात संघटन वाढत गेले. शिवसैनिकांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर आंदोलने केली. झोपडपट्टी पुनर्वसनाची कामे आंदोलनाच्या माध्यमातून मार्गी लागली. त्यावेळी शिवसेनेत बाबासाहेब धुमाळ व गजानन बाबर असे दोन गट कार्यरत होते, असे शिवसैनिक वैशाली मराठे सांगतात.
पहिला खासदार शिवसेनेचा
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघ अस्तित्वात आला. शिवसेनेचे गजानन बाबर पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर बाबर यांनी २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु तेथेही मन रमल्याने त्यांनी २०१९ मध्ये पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्याचे खासदार श्रीरंग बारणे शिंदेसेनेत आहेत.
महापालिका निवडणुकीतील कामगिरी
महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत ७९ जागांपैकी एकाच जागेवर गजानन बाबर नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९२ मध्ये ७८ जागांपैकी ४, तर १९९७ मध्ये ८६ पैकी ११, २००२ च्या निवडणुकीत १०५ पैकी ११ जागा निवडून आल्या. पुढे २००७ निवडणुकीत एकूण १०५ पैकी ११ जागा, २०१२ मध्ये १२८ पैकी १४ जिंकल्या होत्या, तर २०१७ मध्ये शिवसेनेने १२८ पैकी ९ जागा जिंकून १६.६० टक्के मते मिळविली होती.
शिवसेना फुटीनंतर शहरात दोन गट
२०२२ मध्ये उद्धवसेना व शिंदेसेनेमध्ये शिवसेनेची विभागणी झाली. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे शिंदेसेनेत गेले. माजी नगरसेवक निलेश बारणे व प्रमोद कुटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला, आता कुटे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात गेले आहेत. माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीआधी उद्धवसेनेत प्रवेश केलेले संजोग वाघेरे यांना पराभव पत्करावा लागला.
आता घडामोडी काय?
फुटीनंतर उद्धवसेनेचे शहरप्रमुख असलेले माजी नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी आठ दिवसापुर्वी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला. त्यामुळे शहरप्रमुख झालेले संजोग वाघेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर माजी नगरसेवक अमित गावडे, मीनल यादव भाजपसोबत गेल्या आहेत. २०१७ मध्ये निवडून आलेल्यांपैकी केवळ रेखा दर्शिले सध्या उद्धवसेनेसोबत आहेत.