PCMC Election 2026 : भाजपचा पराभव हाच उद्देश; देशावर युद्धाचे संकट; प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 09:47 IST2026-01-10T09:46:33+5:302026-01-10T09:47:16+5:30
देशात सध्या देव-धर्माव्यतिरिक्त कोणतीही चर्चा नाही. महात्मा फुले यांनी धर्माची गरज सांगितली होती

PCMC Election 2026 : भाजपचा पराभव हाच उद्देश; देशावर युद्धाचे संकट; प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
पिंपरी : महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी पिंपरी येथे सभा झाली. या सभेत पक्षाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.
डॉ. आंबेडकर म्हणाले की, देशात एकच पक्ष राहावा, इतर सर्व पक्ष संपावेत, अशी परिस्थिती भाजप निर्माण करू पाहत आहे. चीनसारखी एकपक्षीय व्यवस्था देशात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अमेरिकेने भारतावर सध्या लावलेल्या टेरिफवर एकही राजकीय पक्ष बोलत नाही. शरद पवारही याबाबत बोलत नाहीत. भारतीय माल अमेरिकेत गेला नाही तर डॉलर मिळणार नाही. त्यामुळे डॉलरचा दर १३० रुपयांपर्यंत जाईल. पुढील तीन महिन्यांत डॉलर ३० रुपयांनी वाढेल आणि त्यामुळे देशाचे सुमारे ४० रुपयांचे नुकसान होईल.
ते म्हणाले की, देशात सध्या देव-धर्माव्यतिरिक्त कोणतीही चर्चा नाही. महात्मा फुले यांनी धर्माची गरज सांगितली होती; मात्र आज धर्माचे ठेकेदार महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच वाईट ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. २०२९ ची लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवायची असेल, तर भाजपला पराभूत करणे गरजेचे आहे.
अजित पवार येथून गायब
‘ऑपरेशन सिंदुर’नंतर इतर देशांनी पाकिस्तानला शस्त्र देण्याची घोषणा केली असून, त्यामुळे भारतावर युद्धाचे संकट आहे. पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास पुणे शहर लक्ष्य असू शकते. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांनी भाजपला आव्हान दिल्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर अजित पवार येथून गायब झाले, असा दावाही त्यांनी केला.