PCMC Elections 2026:टीकाकारांची पात्रता पाहूनच प्रतिक्रिया; सुपारीबाजांकडे दुर्लक्ष; अजित पवारांचा पुन्हा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:45 IST2026-01-09T14:44:28+5:302026-01-09T14:45:15+5:30
टीका एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला.

PCMC Elections 2026:टीकाकारांची पात्रता पाहूनच प्रतिक्रिया; सुपारीबाजांकडे दुर्लक्ष; अजित पवारांचा पुन्हा घणाघात
पिंपरी : टीका करणारा किती पात्रतेचा आहे, हे पाहूनच ती मनावर किती घ्यायची, हे ठरवले पाहिजे. काही जण सुपारीबाज आहेत, त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही. पूर्वीचा माझा स्वभाव आणि आजचा स्वभाव वेगळा आहे. सगळ्यांना सोबत घेऊन काम करावे लागते, हे आता कळले आहे. टीका एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला.
उपमुख्यमंत्री पवार गुरुवारी (दि.८) पिंपरी-चिंचवड येथे महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले की, देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहून मतदान केले. पिंपरी-चिंचवडमध्ये माझ्याकडे पाहून आमच्या पक्षाला मतदान करा. येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. सुरुवातीला येथे बाहेरचा-गाववाला असा संघर्ष होता, मात्र नंतर ते चित्र बदलले. आम्ही परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न सातत्याने करत आहोत. जॅकवेल, केबल टेंडरमधील रिंग मोडून काढली. पूर्वी इथे ‘तूही खा, मीही खातो’ अशी अवस्था होती. ती मी बंद केली. मी पद दिल्यानंतर काही जणांना ताकद मिळाली, मात्र त्यांना जबाबदारी पेलली नाही, त्यामुळेच आज घडी विस्कटली आहे. पाणी, कचरा, टँकर माफिया, बकालपणा हे गंभीर प्रश्न आहेत.
स्थानिक कार्यकर्त्यांना जागे करायला आलो!
अजित पवार म्हणाले की, आमचे स्थानिक कार्यकर्ते काही ठिकाणी कमी पडले. त्यांना जागे करायला मी आलो आहे. निष्ठावंत भाजप कार्यकर्ते नाराज असल्यामुळे अनेक जण आमच्याकडे येत आहेत. शिंदेसेनेसोबत युतीची चर्चा सुरुवातीपासून झाली असती तर एकत्र आलो असतो. पण येथे आम्हाला निर्विवाद बहुमत मिळेल. राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवलेली नसून ते प्रचारासाठी वेळ देणार आहेत.