Municipal Election : अण्णा बनसोडेंच्या मुलाच्या उमेदवारीला विरोध;बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवारांसमोर महिलांचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:42 IST2025-12-25T11:14:42+5:302025-12-25T11:42:26+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकरी महिलांचा गट बारामती हॉस्टेलवर पोहोचला. तेथे ‘आम्हाला स्थानिक, तळागाळात काम करणारा उमेदवार हवा असून आमदार पुत्र नको,’ अशी मागणी त्यांनी केली.

Municipal Election : अण्णा बनसोडेंच्या मुलाच्या उमेदवारीला विरोध;बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवारांसमोर महिलांचा गोंधळ
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कडून पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी रणनीती ठरवली जात आहे. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष व पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यासमोर महिलांनी आक्रमक भूमिका घेत प्रभाग क्रमांक ९ मधून बनसोडे यांच्या मुलाला उमेदवारी देण्यास विरोध केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून उमेदवारी, प्रचार आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांवर चर्चा करण्यासाठी पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये बैठकांचे सत्र सुरू असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उमेदवारीवरून गोंधळ उडाला. पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकरी महिलांचा गट बारामती हॉस्टेलवर पोहोचला. तेथे ‘आम्हाला स्थानिक, तळागाळात काम करणारा उमेदवार हवा असून आमदार पुत्र नको,’ अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी झालेल्या वादावादीनंतर या महिलांनी बारामती हॉस्टेलबाहेर पत्रकारांशी संवाद साधत नाराजी व्यक्त केली. ‘लाडकी बहीण म्हणतात, पण आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. आम्ही जीव तोडून मागणी करण्यासाठी आलो असताना दोन मिनिटेही वेळ दिला नाही,’ असा आरोप त्यांनी केला. मात्र, त्यांनी कोणाचेही नाव घेण्याचे टाळले.
उमेदवारी देण्याचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहेत. अद्याप कोणाच्याही नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे कोणीही आपली उमेदवारी निश्चित समजू नये. - आण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार