Municipal Election2026: उमेदवारी कापताच राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षांचा अपक्ष अर्ज;दोन जानेवारीपर्यंत ‘वेट अँड वाॅच’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:46 IST2025-12-31T13:45:52+5:302025-12-31T13:46:03+5:30
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी प्रमुख राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवार जाहीर करत सकाळी एबी फॉर्म वाटप केले.

Municipal Election2026: उमेदवारी कापताच राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षांचा अपक्ष अर्ज;दोन जानेवारीपर्यंत ‘वेट अँड वाॅच’
जाधववाडी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग दोनमधून राष्ट्रवादी (अजित पवार)चा एबी फॉर्म मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी प्रमुख राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवार जाहीर करत सकाळी एबी फॉर्म वाटप केले. प्रभाग २ मधील भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव व उद्धवसेनेच्या महिला शहराध्यक्षा रूपाली आल्हाट यांनी नुकताच राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला होता. त्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्यानंतर उमेदवारी दाखल केली. मात्र, मागील वेळी थोड्या मतांनी पराभूत झालेल्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांची उमेदवारी कापताच त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. अर्ज दाखल करून बाहेर आल्यानंतर त्यांच्या व समर्थकांच्या डोळ्यांत अश्रू दिसून आले. नंतर त्यांनी पतीबरोबर चर्चा केली.
प्रभाग दोनमध्ये मागील वेळी पक्षाचा उमेदवार विजयी झाला होता. मात्र, असे असतानाही यावेळी मला उमेदवारी दिली नाही. दोन तारखेपर्यंत वाट पाहा.
-कविता आल्हाट
अपक्ष उमेदवारीबाबत सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जाईल. -नीलेश बोराटे, उमेदवार, राष्ट्रवादी (अजित पवार)