PCMC Election 2026: मी फक्त महापालिकेच्या कारभाराबाबतच बोललो,इतर कोणतेही आरोप केलेले नाहीत - अजित पवार
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 6, 2026 19:41 IST2026-01-06T19:39:47+5:302026-01-06T19:41:45+5:30
- मी फक्त महापालिकेच्या कारभाराबद्दल बोललो आहे. त्याचे पुरावेही दिले आहेत. इतर कोणतेही आरोप केलेले नाहीत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

PCMC Election 2026: मी फक्त महापालिकेच्या कारभाराबाबतच बोललो,इतर कोणतेही आरोप केलेले नाहीत - अजित पवार
पिंपरी : महायुती म्हणून आम्ही राज्यात आणि केंद्रात एकत्र आहोत. मात्र महापालिका निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढत आहोत. त्यामुळे चर्चा फक्त स्थानिक कारभारापुरतीच असली पाहिजे. मी फक्त महापालिकेच्या कारभाराबद्दल बोललो आहे. त्याचे पुरावेही दिले आहेत. इतर कोणतेही आरोप केलेले नाहीत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उमेदवारांची मंगळवारी (दि.६) बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रचाराबाबत स्पष्ट आणि संयमित भूमिका मांडली. उमेदवारांनी एकोप्याने प्रचार करावा, बोलताना शब्दांची काळजी घ्यावी आणि कोणालाही दुखावेल किंवा ठेच लागेल असे वक्तव्य करू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या. माझे वक्तव्य मीडियाने फुगवून वेगळ्या पद्धतीने दाखवले, त्यामुळे त्यांच्या पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, असे यावेळी पवार यांनी सांगितले.
महापालिकेत नियोजनशून्य कारभार
अजित पवार म्हणाले की, भाजपच्या काळात महापालिका कर्जबाजारी झाली. नियोजनशून्य कारभार करण्यात आला. राष्ट्रवादीच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात शहराचा विकास केला आहे. आम्ही सत्तेत असताना शहरात नवनवीन विकासकामे आणली. मेट्रोचे भूमिपूजन जरी पंतप्रधानांच्या हस्ते झाले असले, तरी प्रकल्प मंजुरीवेळी महापौर राष्ट्रवादीचेच होते. गेल्या नऊ वर्षांत पिंपरी-चिंचवडची काय अवस्था झाली आहे, हे शहरवासीयांना माहीत आहे. संविधानाने सर्वांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार दिला आहे. ते आपली भूमिका मांडतील, मी माझी मांडत आहे. शेवटी जनता जनार्दन सर्व ऐकून कौल देईल.