PCMC Election 2026: उच्चशिक्षितांनाही राजकारणाची भुरळ ;महापालिकेच्या रिंगणात अभियंते, वकील, डॉक्टर, पीएच.डी.धारक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 18:57 IST2026-01-06T18:56:27+5:302026-01-06T18:57:03+5:30
- मतदारांपुढे पर्याय; ६९२ पैकी २६१ उमेदवार पदवीधर; कमी शिक्षित पण स्थानिक प्रश्नांची जाण असलेल्यांकडे अनुभव हाच ‘प्लस पॉइंट’

PCMC Election 2026: उच्चशिक्षितांनाही राजकारणाची भुरळ ;महापालिकेच्या रिंगणात अभियंते, वकील, डॉक्टर, पीएच.डी.धारक
- प्रशांत होनमाने
पिंपरी : महापालिकेच्या निवडणुकीत १२८ जागांसाठी ६९२ उमेदवार मैदानात उतरले आहेत. नऊ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत फक्त राजकीय समीकरणेच नव्हे, तर उमेदवारांचे शिक्षण हा मुद्दाही केंद्रस्थानी आला आहे. विशेष म्हणजे, यंदा एकूण उमेदवारांपैकी २६१ जण पदवीधर असून, ३१ अभियंते, २८ वकील, १२ डॉक्टर आणि ३ पीएच.डी.धारकही मैदानात उतरले आहेत.
महापालिकेचे कामकाज, शहराचा वाढता विस्तार, पाणीपुरवठा, आरोग्य, वाहतूक, पार्किंगची समस्या, कायदे आणि तांत्रिक प्रकल्प पाहता उच्चशिक्षित नगरसेवकांची गरज अधिक भासते, असा दावा एकीकडे केला जातो. दुसरीकडे, कमी औपचारिक शिक्षण असलेले, पण स्थानिक प्रश्नांची खोल जाण असलेले उमेदवार अनुभव हाच आमचा ‘प्लस पॉइंट’ असल्याचे सांगून निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीत मतदार उच्चशिक्षितांना पसंती देतील की जमिनीवर काम करणाऱ्या अनुभवी उमेदवाराला, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.
आम्हीही सक्षम आहोत...
२०१० नंतर पिंपरी-चिंचवड शहरात विस्थापितांची संख्या वाढली आहे. काही पक्षांनी महापालिका निवडणुकीत उच्चशिक्षितांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे काही ठिकाणी मातब्बरांनी माघार घेत पत्नी, मुलगा, सून किंवा मुलगी असे शिक्षित पर्याय निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. काही उच्चशिक्षित उमेदवारांनी प्रभागांतील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आम्हीही सक्षम आहोत, असे सांगत अपक्ष म्हणून लढणे पसंत केले आहे.
प्रचारातून विशेष ओळख
प्रचाराला केवळ सात दिवस उरले आहेत. उमेदवारांनी प्रचारात जोर पकडला आहे. काही उमेदवार प्रचार पत्रकांवर पदवीधर, आयटी इंजिनिअर, डॉक्टर तसेच विविध पदव्यांचा उल्लेख ठळकपणे करत आहेत. प्रचारसभांतील भाषणातही आम्ही शिकलेले असून तुमचे प्रश्न आम्ही उत्तमपणे हाताळू शकतो, असे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
निवडणूक रिंगणात किती उमेदवार उच्चशिक्षित :
- अभियंते : ३१
- वकील : २८
- डॉक्टर : १२
- इतर पदवीधर : १९० पेक्षा अधिक
- बारावी व त्याखालील शिक्षण : ३०० पेक्षा अधिक
- पाचवी व त्याखालील शिक्षण : ४० पेक्षा अधिक