PCMC Election 2026: प्रचार सुसाट..! शेवटच्या टप्प्यात उमेदवारांची प्रचारासाठी मिनी मॅरेथॉन; दिवसाला दहा किमी पायपीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:53 IST2026-01-09T15:52:22+5:302026-01-09T15:53:27+5:30
- पदाधिकारी, कार्यकर्ते 'डोअर टू डोअर' : वैयक्तिक गाठीभेटींवर जोर असल्याने उमेदवारांची पदयात्रा, प्रभागात काही भाग खूप विस्तीर्ण, तर काही भाग अत्यंत दाटीवाटीचे; सोसायट्यांसह गल्लीबोळामध्ये प्रचार सुसाट

PCMC Election 2026: प्रचार सुसाट..! शेवटच्या टप्प्यात उमेदवारांची प्रचारासाठी मिनी मॅरेथॉन; दिवसाला दहा किमी पायपीट
- आकाश झगडे
पिंपरी : महापलिकेच्या निवडणूक प्रचारासाठी सातच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवार लगबग करत आहेत. उमेदवारांचा वैयक्तिक गाठीभेटींवर जोर असल्याने पदयात्रा करावी लागत आहे. त्यांनी 'डोअर टू डोअर' भेटींवर भर दिला आहे. यामुळे त्यांची पायपीट होत असून, शहराचा विस्तार, प्रभागांची रचना आणि मतदारसंख्या पाहता हा प्रचार मिनी मॅरेथॉन ठरत आहे.
शहराचे एकूण क्षेत्रफळ १८१ चौरस किलोमीटर आहे. त्यात एकूण ३२ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागाचे सरासरी क्षेत्रफळ साधारणपणे ५.६५ चौरस किलोमीटर आहे. ही केवळ सरासरी आहे; प्रत्यक्षात काही प्रभाग खूप विस्तीर्ण आहेत, तर काही अत्यंत दाटीवाटीचे आहेत. शेवटच्या दिवसांत प्रत्येक उमेदवार सकाळी सात ते रात्री १० या वेळेत सरासरी दहा किलोमीटर चालत आहेत. दिवसाला १३ ते १५ हजार पावले चालत असल्याचे त्यांच्या 'फिटनेस बँड'वर दिसत आहे.
कार्यकर्त्यांचेही हाल, दिवसभर फिरून पाय सुजतायेत
वाकड, हिंजवडी, मोशी आणि रावेत यांसारख्या भागात मोठ्या सोसायट्या आहेत. एका सोसायटीत ५०० ते १००० फ्लॅट्स असल्याने लिफ्टचा वापर करून प्रत्येक मजल्यावर जाणे आणि चालणे यात वेळ जातो. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी येथील चाळींमध्ये उमेदवारांना गल्लीबोळातून खूप चालावे लागते. केवळ उमेदवारच नाही, तर त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. सकाळी घातलेले बूट संध्याकाळी काढताना पाय सुजलेले असतात, अशी भावना एका कार्यकत्यनि व्यक्त केली.
१३, २१ प्रभाग लहान
३, २५, १६ मध्ये मतदारसंख्या अनुक्रमे ७२ हजार, ६६ हजार व ७५ हजार आहे. विस्तीर्ण पसरलेले व जास्त मतदारसंख्या यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत होत आहे. प्रभाग क्रमांक १३, २१, २२, ३१, ३२ हे क्षेत्रफळाने लहान आहेत.
प्रभागांमध्ये ३, २५ आणि - १६ चे क्षेत्रफळ सर्वाधिक
उपनगरांचे प्रभाग क्षेत्रफळाने मोठे आहेत, तर गावठाण आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभाग तुलनेने लहान आहेत. यात मोठ्या क्षेत्रफळांच्या प्रभागांमध्ये ३,२५ आणि १६ यांचा समावेश होतो.