Municipal Election : पिंपरीत भाजपची पहिली यादी उद्या, राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 11:00 IST2025-12-27T10:54:15+5:302025-12-27T11:00:01+5:30
- अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा; आझम पानसरेंच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक, निर्णय गुलदस्त्यात, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रभागनिहाय राजकीय परिस्थिती, स्थानिक समीकरणे, इच्छुक उमेदवारांची ताकद, संघटनात्मक कामगिरी यांचा आढावा

Municipal Election : पिंपरीत भाजपची पहिली यादी उद्या, राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक
पिंपरी : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पहिली उमेदवार यादी रविवारी (दि. २८) जाहीर होणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी शुक्रवारी दिली. तर राष्ट्रवादीची तयारी जोरात सुरू असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी महापौर आझम पानसरे यांच्या घरी शुक्रवारी भेट दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार हालचाली सुरू आहेत. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवार निवड हे मोठे आव्हान ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात बैठक घेतली. यावेळी कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रभागनिहाय राजकीय परिस्थिती, स्थानिक समीकरणे, इच्छुक उमेदवारांची ताकद, संघटनात्मक कामगिरी आणि जिंकण्याची क्षमता यांचा सखोल आढावा घेतला. ज्या प्रभागांमध्ये उमेदवारीबाबत एकमत झाले आहे, त्या नावांना प्राथमिक मान्यता दिली. अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. त्यामुळे रविवारी भाजपची पहिली यादी जाहीर होईल, अशी आमदार जगताप यांनी माहिती दिली.
राष्ट्रवादीतही घडामोडींना वेग
या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही तयारीला वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी गटांकडून प्रभागनिहाय ताकद मोजणे, उमेदवारीवर चर्चा, प्रचार आराखडा आणि संभाव्य आघाड्यांबाबत बैठका सुरू आहेत. भाजपची पहिली यादी जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीकडून रणनीती आखण्यावर भर दिला जात आहे.
ठरले की सांगतो : अजित पवार
राष्ट्रवादीचे (अजित पवार) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची त्यांच्या निगडी येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पवार यांच्यासमवेत पानसरे, निहाल पानसरे, नाना काटे, प्रमोद कुटे, जिशान सय्यद, योगेश बाबर, प्रशांत कापसे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत काय चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, उपमुख्यमंत्री पवार यांनी ठरले की सांगतो, एवढीच प्रतिक्रिया देत माध्यमांशी बोलणे टाळले.
दोन दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील : पानसरे
उपमुख्यमंत्री पवार माझ्या निवासस्थानी भेटीसाठी आले होते. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पुढील दोन दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये शंभर टक्के सत्ता मिळेल, असा दावा माजी महापौर आझम पानसरे यांनी केला. दरम्यान, आपण स्वतः आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, या प्रश्नावर पानसरे यांनी नकार दिला असून, निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. ---
बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून काळजी
उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर संभाव्य नाराजी आणि अंतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून विशेष काळजी घेतली जात आहे. काही प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नाराजांची समजूत घालणे, पर्यायी जबाबदाऱ्या देणे आणि संघटनात्मक पातळीवर त्यांना सक्रिय ठेवण्याची रणनीती आखली आहे. भाजपमध्ये अनेक प्रभागांत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने अंतर्गत बंडखोरीचा धोका वाढला आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते आणि स्थानिक नेतृत्वाकडून नाराजांना समजूत घालण्याचे प्रयत्न, सर्वेक्षणांच्या आधारे अंतिम नावे ठरवण्याची प्रक्रिया, तसेच पर्यायी जबाबदाऱ्यांचे आश्वासन देण्याची रणनीती आखली जात आहे. पहिल्या यादीत ‘विजयी चेहरा’ आणि ‘संघटनात्मक समतोल’ या निकषांना प्राधान्य दिले जाण्याची चर्चा आहे.