PCMC Election 2026: टीकेला सामोरे जात अजित पवारांनी शहराचा विकास केला- सुनेत्रा पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 14:39 IST2026-01-11T14:39:03+5:302026-01-11T14:39:36+5:30
प्रत्येक प्रभागातील निरीक्षकांच्या भेटी घेऊन आम्ही प्रचार कसा सुरू आहे, कोणत्या अडचणी आहेत, याची माहिती घेतली.

PCMC Election 2026: टीकेला सामोरे जात अजित पवारांनी शहराचा विकास केला- सुनेत्रा पवार
पिंपरी : मोठे व्हायचे असेल तर टीका होतच असते. कुटुंब म्हणून आम्हाला या टीकेची सवय आहे; मात्र आम्हीही माणसे आहोत, आम्हालाही भावना आहेत. तरीही अजित पवारांनी सर्वांवर मात करीत पिंपरी-चिंचवडचा विकास केला आणि त्याच पावलावर पाऊल ठेवत आम्ही पुढे चाललो आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या (अजित पवार) खासदार सुनेत्रा पवार यांनी केले.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार पवार यांनी शहराला भेट दिली. त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागांतील निरीक्षकांच्या बैठका घेऊन प्रचाराची सद्य:स्थिती, तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पवार म्हणाल्या की, प्रत्येक प्रभागातील निरीक्षकांच्या भेटी घेऊन आम्ही प्रचार कसा सुरू आहे, कोणत्या अडचणी आहेत, याची माहिती घेतली. अजित पवारांनी मनापासून पिंपरी-चिंचवडच्या निर्मितीत सहभाग घेतला. शहरातील प्रत्येक गोष्ट उभारताना त्यांनी वेळ दिला, विचार केला आणि अनेक वर्षांचा दूरदृष्टीचा विचार करून या शहराचा विकास घडविला. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी या शहरावर प्रेम केले.
राज्यासह शहरातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आम्ही फक्त विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जात आहोत. मागील काही वर्षांत शहराची जी अवस्था झाली, त्या पार्श्वभूमीवर आम्ही विचार करत आहोत. इतर विषयांकडे फारसे लक्ष न देता विकासालाच प्राधान्य दिले आहे. राज्यात ज्या पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या आहेत, त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्येही झाल्या आहेत. याबाबत अजित पवार सविस्तर उत्तर देतील.