Municipal Election : महापालिका निवडणुकीसाठी अखेर १२८ जागांसाठी प्रारूप आरक्षण जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:14 IST2025-11-12T14:14:06+5:302025-11-12T14:14:50+5:30
- राजकीय गणितांमध्ये उलथापालथ होणार : सर्वच पक्षांतील हालचालींना गती; इच्छुकांकडून जुळवाजुळवीला सुरुवात; ‘एससी’साठी २०, ‘एसटी’साठी ३, तर ओबीसींसाठी ३४ जागा राखीव

Municipal Election : महापालिका निवडणुकीसाठी अखेर १२८ जागांसाठी प्रारूप आरक्षण जाहीर
पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित प्रारूप आरक्षण सोडत मंगळवारी (दि. ११) पार पडली. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, अनेक प्रभागांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक प्रक्रियेला औपचारिक सुरुवात झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अंतिम आरक्षण सोडत २ डिसेंबरला होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात शालेय मुलांच्या हस्ते प्रारूप आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, तृप्ती सांडभोर आदी उपस्थित होते. आरक्षण प्रक्रियेदरम्यान सभागृहात मोठी गर्दी झाली होती. इच्छुक उमेदवार आणि पक्षांचे कार्यकर्ते आरक्षण सोडत पाहण्यासाठी उपस्थित होते. सोडत पारदर्शक पद्धतीने पार पडल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली
आधी एससी, एसटी त्यानंतर ओबीसीचे आरक्षण
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १२८ असून, ३२ प्रभाग आहेत. १२८ पैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे ६४ नगरसेविका आणि ६४ नगरसेवक आहेत. अनुसूचित जातींसाठी (एससी) २०, तर अनुसूचित जमातींसाठी (एसटी) ३ जागा आरक्षित आहेत. ओबीसींसाठी ३४ जागा राखीव आहेत. सोडतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार आधी एससी, एसटी, ओबीसी आणि त्यानंतर सर्वसाधारण महिला आरक्षण काढण्यात आले.
अंतिम आरक्षण सोडत २ डिसेंबरला
आरक्षणाचे प्रारूप १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. या प्रारूप आरक्षण सोडतीवर १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन पर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची अंतिम मुदत आहे. हरकती सूचना महापालिका मुख्यालय, निवडणूक कार्यालय किंवा महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात नोंदविता येणार आहेत. महापालिकेची वेबसाइट, ई-मेल किंवा ऑनलाइन प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. त्यानंतर २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका एकूण जागा १२८
वर्ग - एकूण जागा - पुरूष - महिला
अनुसूचित जाती (एससी)-२०-१०-१०
अनुसूचित जमाती (एसटी)- ०३-०१-०२
इतर मागास वर्ग (ओबीसी)- ३४-१७-१७
सर्वसाधारण खुला (ओपन)-७१ - ३६ - ३५
एकूण- १२८ - ६४ - ६४