पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारीच सादर होणार; स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर होणार सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 14:11 IST2026-02-25T14:09:55+5:302026-02-25T14:11:10+5:30

-आर्थिक स्थिती विचारात घेऊन वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा अधिकाऱ्यांचा दावा

pimpari-chinchwad municipal Corporation budget to be presented on Saturday | पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारीच सादर होणार; स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर होणार सभा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारीच सादर होणार; स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर होणार सभा

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी (दि. २८) आयुक्त श्रावण हर्डीकर स्थायी समितीपुढे सादर करणार आहेत. स्थायी समितीच्या नवीन सभापतींची निवड झाल्यानंतर त्याच दिवशी होणाऱ्या पहिल्या सभेत हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. तशी तयारी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. महापालिकेतील मागील चार वर्षांची प्रशासक राजवट निवडणुकीनंतर संपुष्टात आली.


महापौर, उपमहापौर निवडणुकीनंतर स्थायी समितीची स्थापना ही महत्त्वाची प्रक्रिया सुरू आहे. स्थायी समिती सदस्य नियुक्तीनंतर शनिवारी सभापती निवडीसाठी निवडणूक होत आहे. सभापती निवडणूक न झाल्यामुळे फेब्रुवारीत अर्थसंकल्प मांडला जाणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, नियमाप्रमाणे फेब्रुवारी संपण्याच्या आत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी स्थायी समिती सभापती निवड व त्याच दिवशी समितीची विशेष सभा घेऊन अर्थसंकल्प सादर होणार आहे.

स्थायी समितीच्या या विशेष सभेचे विषयपत्र तयार करण्यात आले आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शनिवारी दुपारी बारा वाजता ही सभा होईल. या सभेत आयुक्त हर्डीकर स्थायी समितीपुढे हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने झालेल्या सभापतींना पहिल्याच बैठकीत अर्थसंकल्पावर निर्णय घ्यावा लागणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प फुगीर नसेल. तो पालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेऊन वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याचा प्रयत्न केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेत फेब्रुवारी २०२२ ला प्रशासकीय राजवट लागली. त्याच्यानंतरच्या काळात सलग तीन अर्थसंकल्प प्रशासकांकडून सादर करण्यात आले. आर्थिक नियोजन, विकासकामे आणि निधीवाटपाचे निर्णयही प्रशासकांच्या माध्यमातूनच घेतले जात होते. मात्र, यावेळी आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समिती आणि नंतर महासभेद्वारे नगरसेवकांना बदल करता येणार आहेत.
 

तिजोरीत खणखणाट : नवनिर्वाचितांसमोर आव्हान

गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विविध प्रकल्प, पायाभूत सुविधा, रस्ते, उड्डाणपूल, पाणीपुरवठा आणि विविध प्रकल्पांवर खर्च झाला आहे. त्यातच महसुलातील अपेक्षित वाढ न झाल्याने महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर काही प्रमाणात ताण असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मर्यादित आर्थिक साधनसंपत्तीमध्ये विकासकामांचा समतोल साधणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे. राजकीयदृष्ट्याही हा अर्थसंकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी निधीची अपेक्षा आहे.

अर्थसंकल्प तयार करण्याचे पूर्ण कामकाज पूर्ण झालेले आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार, अर्थसंकल्प सादरीकरणासाठी स्थायी समितीची विशेष सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. - प्रवीण जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका

Web Title : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका का बजट शनिवार को समिति चुनाव के बाद पेश होगा।

Web Summary : पिंपरी-चिंचवड का 2026-27 का बजट शनिवार को स्थायी समिति के अध्यक्ष के चुनाव के बाद पेश किया जाएगा। यह चार साल के प्रशासनिक शासन के बाद हो रहा है। वित्तीय बाधाओं के बीच, नवनिर्वाचित पार्षद विकास के लिए धन की उम्मीद कर रहे हैं।

Web Title : Pimpri-Chinchwad Municipal Corporation budget to be presented Saturday after committee election.

Web Summary : Pimpri-Chinchwad's budget for 2026-27 will be presented to the Standing Committee on Saturday following the election of its chairperson. This comes after a four-year administrative rule. Newly elected councilors anticipate funds for development amidst financial constraints.