आरक्षण बदलल्याने इच्छुकांच्या आशेवर पाणी;आरक्षण सोडतीनंतर नव्याने आखली जाणार राजकीय समीकरणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:06 IST2025-11-12T15:03:16+5:302025-11-12T15:06:46+5:30
- सोडतीनंतर नव्याने आखली जाणार राजकीय समीकरणे : दिग्गजांच्या जागा राखीव

आरक्षण बदलल्याने इच्छुकांच्या आशेवर पाणी;आरक्षण सोडतीनंतर नव्याने आखली जाणार राजकीय समीकरणे
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव जागांची सोडत मंगळवारी काढण्यात आली. दरवेळप्रमाणे यंदाही काही प्रभागांमध्ये आरक्षण बदलल्याने माजी नगरसेवक आणि इच्छुकांच्या आकांक्षांवर पाणी फिरले आहे. विशेषतः मागील निवडणुकीत खुले असलेले काही प्रभाग यावेळी आरक्षणात आल्याने अनेकांना नवीन गणिते आखावी लागतील.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस आणि ठाकरे गट या सर्वांनी संभाव्य उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. काही प्रभागांमध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रभागात आरक्षण आल्याने पक्षातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. आरक्षण सोडतीनंतर शहरातील राजकीय समीकरणे नव्याने आखली जाणार आहेत. पुढील काही दिवसांत उमेदवार ठरवण्याची आणि प्रचार योजनांची लगबग सुरू होईल.
अनुसूचित जातीतील उमेदवारांना फटका
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या जागेवर निवडून आलेल्यांपैकी काही जणांना आरक्षणाचा फटका बसला. ज्यामध्ये प्रभाग ४ मध्ये विकास डोळस, प्रभाग १९ मध्ये शैलेश मोरे, प्रभाग २९ मधील सागर आंगोळकर, प्रभाग ३१ मधील अंबरनाथ कांबळे, प्रभाग ३२ मधील संतोष कांबळे यांचा समावेश आहे. त्यांना आरक्षित जागेवरून पुन्हा लढता येणार नाही. एससी महिला आरक्षित जागांमुळे प्रभाग १० मधून अनुराधा गोरखे, प्रभाग २१ मधून निकिता कदम, प्रभाग क्रमांक २३ मनीषा पवार या माजी नगरसेविकांच्या जागा सुरक्षित झाल्या आहेत.
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी तीन जागा
अनुसूचित जमातीच्या तीनपैकी प्रभाग २९ व ३० मधील दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहे. त्यात माजी नगरसेविका उषा मुंढे यांची जागा सुरक्षित झाली आहे. अंतिम प्रभाग रचनेत झालेल्या बदलामुळे एससी व एसटी आरक्षणात बदल झाला. परिणामी, प्रभाग ३ मोशी, चऱ्होली आणि प्रभाग १७ मध्ये बिजलीनगर, भोईरनगरमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण पडले. या दोन्ही प्रभागात सर्वसाधारण जागेवरून लढणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. आरक्षित जागांमुळे दोन्ही ठिकाणी माजी नगरसेवकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
दिग्गज ओबीसींना खुल्या गटात लढावे लागणार
महिला नगरसेविकांमध्ये चंद्रकांता सोनकांबळे, प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, प्रभाग २० मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुलक्षणा धर यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. दोन्ही प्रभागातील अनुसूचित जातीच्या जागेवर महिला आरक्षण नाही. या जागेवर पुरुष व महिला दोन्ही उमेदवार रिंगणात असतील. प्रभाग १० मध्ये एससी व ओबीसीच्या जागांवर महिला आरक्षण पडले आहे. तिथे राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांनाही सर्वसाधारण जागेवरून लढावे लागणार आहे. प्रभाग १२ मध्ये एक जागा ओबीसी, तर दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या मुलाचा पत्ता कट?
प्रभाग ३० मध्ये सर्व जागा आरक्षित झाल्यामुळे या प्रभागात खुल्या गटातील इच्छुकांची कोंडी होणार आहे. ओबीसी जागा महिलांसाठी राखीव नाही. त्यामुळे माजी नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासमोर अडचण निर्माण झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे ज्या प्रभाग १९ मधून इच्छुक आहे, तिथे महिला आरक्षण पडल्यामुळे त्यांना नवीन प्रभागातून तयारी करावी लागणार आहे.
पक्षांतर्गतही करावा लागणार संघर्ष
काही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक आहे. यामुळे अशा प्रभागांमध्ये अनेकांना उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षांतर्गत संघर्ष करावा लागणार आहे. काही जणांना पुन्हा महापालिकेच्या सभागृहात जाण्याच्या इच्छेवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. उमेदवारी वाटप करताना पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी वाढणार आहे. यामध्ये नाराजी टाळण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.