PCMC Elections 2026 महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात; मतदानाला उरले पाच दिवस; प्रमुख पक्षांचे जाहीरनामे आहेत कोठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:15 IST2026-01-10T10:13:21+5:302026-01-10T10:15:29+5:30
- महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. मतदानास पाच दिवस उरले तरी अद्याप प्रमुख पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही.

PCMC Elections 2026 महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात; मतदानाला उरले पाच दिवस; प्रमुख पक्षांचे जाहीरनामे आहेत कोठे?
पिंपरी : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. मतदानास पाच दिवस उरले तरी अद्याप प्रमुख पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे कोणत्या मुद्द्यांवर मतदान करायचे, असा सवाल शहरातील नागरिक करू लागले आहेत.
शहरातील आखाड्यात भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार), शिंदेसेना, काँग्रेस, उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी, मनसे, आम आदमी पक्ष यांच्यासह अपक्ष उतरले आहेत. सभा, कोपरा सभा, बैठका होत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र, पक्षांचे व्हिजन काय असेल, आराखडा काय असेल, याबाबत प्रमुख पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही.
उणीदुणी काढण्यातच धन्यता
निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. सिटीझन फोरमने, गृहनिर्माण सोसायटी फेडरेशनने अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. शिंदेसेनेने शुक्रवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मात्र, शहरांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना पाच मुद्दे मांडल्याचे सांगितले होते. मात्र, त्यातील तपशिलाची माहिती दिली नव्हती. राष्ट्रवादीच्या वतीने ११ जानेवारीला तर भाजपच्या वतीने शनिवारी जाहीरनाम्याचे प्रकाशन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उद्धवसेनेची जाहीरनाम्याची तयारी सुरू आहे.
सभा, बैठकांमध्ये पक्षाची शहराच्या विकासाविषयी भूमिका मांडली जात आहे. पक्षाचा जाहीरनामा ११ तारखेला सकाळी ११ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. - योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार)
पुढील विकासाचे व्हिजन विकास आराखड्यातून मांडले जाणार आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. - अमित गोरखे, आमदार, भाजप
महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेला जाहीरनामा आजच प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यातून शहराचे व्हिजन आणि प्रश्न सोडवणुकीसंदर्भात भूमिका मांडली आहे. - श्रीरंग बारणे, खासदार, शिंदेसेना
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या जाहीरनाम्यासंदर्भात मुद्दे काढण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत अहवालाचे प्रकाशन करण्याचे नियोजन आहे. - गौतम चाबूकस्वार, उद्धवसेनेचे नेते