PCMC Election Results 2026: पिंपरीत यंदा अनेक विजयी उमेदवार थोडक्या मतांनी बचावले; निसटत्या पराभवामागचे कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 15:34 IST2026-01-19T15:34:11+5:302026-01-19T15:34:31+5:30
PCMC Election Results 2026 काही ठिकाणी शिंदेसेना, मनसेचे उमेदवार, अपक्ष तसेच ‘नोटा’लाही विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या फरकाच्या मतांपेक्षा जास्त मते मिळाली

PCMC Election Results 2026: पिंपरीत यंदा अनेक विजयी उमेदवार थोडक्या मतांनी बचावले; निसटत्या पराभवामागचे कारण आले समोर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत यंदा अनेक प्रभागांतील विजयी उमेदवार थोडक्या मतांनी बचावले, तर काही ठिकाणी शिंदेसेना, मनसेचे उमेदवार, अपक्ष तसेच ‘नोटा’लाही विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या फरकाच्या मतांपेक्षा जास्त मते मिळाली.
प्रभाग ८ मधून भाजपच्या सुहास कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या सीमा सावळे यांचा २५६ मतांनी पराभव केला. तेथे शिंदेसेनेचे महेंद्र सरवदे यांना १५९८ मते आहेत. याचप्रमाणे प्रभाग ३२ मधून भाजपचे प्रशांत शितोळे यांनी राष्ट्रवादीचे अतुल शितोळे यांचा २९० मतांनी पराभव केला. तेथे मनसेचे राजू सावळे यांना १०२५ मते मिळाली आहेत.
प्रभाग २३ मध्ये राष्ट्रवादीच्या योगिता बारणे (४३९) आणि प्रभाग ३० मध्ये प्रतीक्षा जवळकर (५००) यांचे विजयही निसटते ठरले. या दोन्ही ठिकाणी शिंदेसेनेच्या उमेदवारांनी हजारांच्या आसपास मते घेतली. प्रभाग ३१ मध्ये भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर जगताप यांनी राष्ट्रवादीचे राजेंद्र जगताप यांचा ५२३ मतांनी पराभव केला. येथे अपक्ष सागर परदेशी यांना ६१२६ मते मिळाली. प्रभाग २७ मधून सागर कोकणे यांनी भाजपचे चंद्रकांत नखाते यांचा ६०० मतांनी पराभव केला. प्रभाग १३ मधून भाजपचे उत्तम केंदळे यांनी मनसेच्या सचिन चिखले यांना ६०७ मतांनी पराभूत केले.
भीमाबाई फुगे (७३४) तसेच दीप्ती कांबळे (७४५) यांनाही त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा ‘नोटा’ला जास्त मते मिळाली आहेत. प्रभाग ८ मधून तुषार सहाणे यांनी भाजपचे माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांचा ७९० मतांनी पराभव केला.
प्रभाग १९ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना समसमान मते
प्रभाग क्रमांक १९ मध्ये राष्ट्रवादीच्या सविता आसवानी यांनी भाजपच्या जयश्री गावडे यांचा अवघ्या २१ मतांनी पराभव केला. मात्र, या लढतीत अपक्ष कविता शैलेंद्र मोरे यांना ३२४२ आणि पिंपरी-चिंचवड परिवर्तन आघाडीच्या अनिता भंडारे यांना २६४८ मते मिळाली आहेत. मंदार देशपांडे यांनी भाजपकडून ३१५ मताधिक्क्याने विजय मिळवला तर राष्ट्रवादीचे काळुराम पवार यांचा पराभव झाला. तेथे पिंपरी-चिंचवड परिवर्तन आघाडीचे जीतू पहलानी यांना ५४४६ मते मिळाली. या प्रभागात राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांना मिळालेली मते समसमान आहेत.
यांना मिळाले मताधिक्य...
भाजपचे नितीन काळजे यांनी तब्बल १९,६५३ मतांचे मोठे मताधिक्य मिळवत शहरातील सर्वांत मोठा विजय नोंदवला. त्यांच्यानंतर राष्ट्रवादीचे संदीप वाघेरे (१६,४३०), भाजपचे सचिन तापकीर (१६,२२९), सारिका गायकवाड (१६,०११), राहुल कलाटे (१४,८९६), स्नेहा कलाटे (१४,३४९), रेश्मा भुजबळ (१४,२५७), श्रुती डोळस (१३,५७४), हिराबाई घुले (१२,९९२), अर्चना सस्ते (१२,९१९), शैलजा मोरे (१२,८६६), विनायक गायकवाड (१२,७८४) आणि कुणाल वाव्हळकर (१२,७०७) यांनीही पाच आकडी मताधिक्याने विजय मिळवला. राष्ट्रवादीचे डब्बू आसवानी यांनी १२,१३९ मतांनी विजय मिळवत पक्षासाठी महत्त्वाची जागा राखली.