PCMC Election Results 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा दबदबा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 20:13 IST2026-01-16T20:12:35+5:302026-01-16T20:13:10+5:30
- भाजप ८४ जागांसह सत्तेवर ठाम, राष्ट्रवादी ३७ वरच अडखळली; शिंदेसेना ६, अपक्ष १

PCMC Election Results 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा दबदबा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का
पिंपरी : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात स्पष्ट कौल टाकत शहराच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला आहे. १२८ जागांच्या महापालिकेत भाजपने तब्बल ८४ जागा जिंकत एकहाती सत्ता प्रस्थापित केली. या निकालामुळे भाजपची शहरातील पकड अधिक मजबूत झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला ६ जागा मिळाल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी ठरला आहे.
महापालिकेचे एकूण ३२ प्रभाग असून १२८ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे १२६ जागांसाठी ६९२ उमेदवार रिंगणात होते. गुरुवारी (दि.१५) पार पडलेल्या मतदानात ५७.७१ टक्के मतदान झाले. २०१७ च्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरलेला असतानाही भाजपच्या मताधिक्यात मात्र लक्षणीय वाढ झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
भाजप उमेदवारांची सुरुवातीपासूनच आघाडी...
शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. विशेषतः नव्याने समाविष्ट झालेल्या भागांसह मध्यवर्ती व औद्योगिक परिसरात भाजपला मोठे यश मिळाले. राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अनेक प्रभागांमध्ये भाजपने धक्कादायक विजय मिळवत राष्ट्रवादीला पिछाडीवर ढकलले. संघटनात्मक ताकद, बूथनिहाय नियोजन, प्रभावी प्रचार आणि केंद्र व राज्यातील सत्तेचा लाभ हे भाजपच्या विजयामागील महत्त्वाचे घटक मानले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात असून, विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. शिंदे गटाच्या शिवसेनेला ६ जागांवर यश मिळाले. मात्र काही प्रभागांमध्ये त्यांनी चुरशीची लढत दिल्याचे चित्र दिसून आले. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.
---
मतमोजणीला उशिरा सुरुवात...
दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेलाही मोठा वेळ लागला. सकाळी नियोजित वेळेत मतमोजणी सुरू न झाल्याने संपूर्ण प्रक्रियेला विलंब झाला. काही मतमोजणी केंद्रांवर ईव्हीएम यंत्रे तसेच कर्मचारी उशिरा पोहोचल्यामुळे सुरुवातीस अडथळे आले. त्याचबरोबर ईव्हीएम तपासणी, स्ट्राँग रूम उघडणे आणि यंत्रे मतमोजणी टेबलांवर नेण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरली. अनेक प्रभागांमध्ये चुरशीची लढत असल्याने फेरीनिहाय मतमोजणीदरम्यान प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक पडताळणी करण्यात आली. टपाल मतमोजणी आणि ईव्हीएम मतमोजणीचा समन्वय साधताना अतिरिक्त वेळ गेला.
---
सायंकाळी ८ वाजता अधिकृत निकाल...
काही ठिकाणी मतमोजणी प्रतिनिधींच्या हरकती, सुरक्षा कारणास्तव प्रवेश नियंत्रण आणि समर्थकांची वाढलेली गर्दी यामुळेही प्रक्रियेचा वेग मंदावला. परिणामी बहुतांश प्रभागांचे निकाल दुपारनंतर जाहीर झाले, तर अंतिम व अधिकृत निकाल सायंकाळी ८ वाजेपर्यंत स्पष्ट झाले.
-------------
महापालिकेचा निकाल
१२८ नगरसेवक
भाजप- ८४
राष्ट्रवादी (अजित पवार) - ३७
शिंदेसेना-०६
अपक्ष -०१