PCMC Election 2026: मतदान करताना ईव्हीएमचा फोटो व्हायरल; पिंपरीत भाजप उमेदवाराच्या पतीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 17:06 IST2026-01-15T17:04:59+5:302026-01-15T17:06:47+5:30
PCMC Election 2026 ईव्हीएम मशीनचा फोटो काढणे आणि तो प्रसारित करण्यास असतानाही उमेदवारांच्या पतीने मतदान करतानाचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला

PCMC Election 2026: मतदान करताना ईव्हीएमचा फोटो व्हायरल; पिंपरीत भाजप उमेदवाराच्या पतीवर गुन्हा दाखल
पिंपरी : मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीनवर मतदान करताना मोबाइलमध्ये फोटो काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. याप्रकरणी चिंचवड येथील भाजप उमेदवार अपर्णा डोके यांचे पती नीलेश चंद्रकांत डोके (रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुरुवारी (दि. १५ जानेवारी) चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मधील केंद्र कल्याण प्रमिष्ठा निर्मित सुखी भवन क्रमांक ५५ येथील खोली क्रमांक एक येथे नीलेश डोके यांचे मतदान होते. गुरुवारी (दि. १५ जानेवारी) सकाळी साडेसात ते मतदान करण्यासाठी गेले. मतदान केंद्रावर मोबाईल फोन नेण्यास मनाई असताना देखील त्यांनी मोबाईल फोन स्वतःकडे बाळगला. तसेच ईव्हीएम मशीनचा फोटो काढणे आणि तो प्रसारित करण्यास मनाई आहे. असे असताना देखील नीलेश डोके यांनी ते मतदान करतानाचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यांनी मतदान गोपनीयतेचा भंग केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २२३ सह महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम २२/४ व २२/५ (भादंवि कलम १८८ प्रमाणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश डोके हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराचे पहिले शहराध्यक्ष तसेच पीसीएमटीचे माजी सदस्य आहेत. त्यांच्या पत्नी अपर्णा डोके या माजी महापौर आहेत. अपर्णा डोके यांनी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच त्या भाजपकडून प्रभाग क्रमांक १८ मधून महापालिका निवडणूक लढवत आहेत. त्यांचे पती नीलेश डोके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खबळबळ उडाली आहे.