PCMC Election 2026: भोसरीत सत्तर लाखांचा पूल ७ कोटींपर्यंत कसा जातो? अजितदादांचा सवाल, लांडगेंवर पुन्हा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:05 IST2026-01-09T15:04:43+5:302026-01-09T15:05:58+5:30
PCMC Election 2026 या पुलावरून एक माणूस जात नाही. त्यातून कोणाचे भले झाले हेही बघितले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्या, अजित पवारांचे आवाहन

PCMC Election 2026: भोसरीत सत्तर लाखांचा पूल ७ कोटींपर्यंत कसा जातो? अजितदादांचा सवाल, लांडगेंवर पुन्हा निशाणा
पिंपरी : भोसरीतील आमदारांच्या कार्यालयाजवळ शीतलबाग पादचारी पुलाचे काम सुरुवातीला सत्तर लाखाला दिले होते. पण तो पूल पूर्ण होईपर्यंत सात कोटीपर्यंत खर्च कसा जातो? या पुलावरून एक माणूस जात नाही. त्यातून कोणाचे भले झाले हेही बघितले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (दि.८) पिंपरी-चिंचवड येथे केले. उपमुख्यमंत्री पवार यांनी शहरात प्रचारसभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी भाजपच्या स्थानिक आमदारांवर घणाघात केला.
पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवडला नऊ वर्षांत या वाईट प्रवृत्तींनी दृष्ट लावली. धनश्री कन्स्ट्रक्शन कंपनीची उलाढाल बघा. शहरातील ७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्या कामांमध्ये २५० कोटींचा चुराडा केला आहे. तो पैसा करदात्यांच्या आहे. हरित सेतू प्रकल्पाला प्रचंड विरोध आहे. त्यांना हरित सेतू करायला कोणी सांगितले? शहराची विस्कटलेली घडी बसविण्याची आता गरज आहे.
टीडीआर, एसआरए घोटाळे कोणी केले?
पवार म्हणाले की, रस्ता सफाई करणाऱ्या महिलांना रात्रीतून काम लावले जाते. मात्र, शहरातील कचरा उचलला जात नाही. त्यातून फक्त बिले उचलली जातात. कंत्राटदारांचे भले केले जाते. कुत्र्यांच्या नसबंदीसाठी सात कोटी रुपये यांनी खर्च केले तरीही कुत्र्यांना पिल्ले का होतात? टीडीआरचा आणि एसआरएचा घोटाळा केवढा मोठा आहे! कुदळवाडीतील साडेचार हजार अतिक्रमणे पाडली. त्यातून उद्योजक देशोधडीला लागले. त्यातून चर्चा करून मार्ग काढला जाऊ शकला असता. मात्र, तसे न करता थेट कारवाई करण्यात आली. त्याला कोण जबाबदार?
शहरात दहशत वाढली
पवार म्हणाले की, शहरातील कार्यकर्ते मला भेटतात. दहशत असल्याचे सांगतात. त्यामुळे या शहराची शांतता धोक्यात आली आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर तिकडे गेलेल्यांना मी विचारले तर त्यांचे उत्तर, ‘आर्थिक अडचणीत सापडलो असल्यामुळे तिकडे जात आहोत’, असे येते. त्यांनी आधीच नऊ वर्षे महापालिका लुटून खाल्ली आहे. आता त्यांना हे साथ द्यायला हे चालले आहेत!
काही अधिकाऱ्यांची वैतागून स्वेच्छानिवृत्ती
पवार म्हणाले की, भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेत दडपशाही वाढली. चुकीच्या कामांवर जबरदस्तीने सह्या करून घेतल्या. फायलीवर सही नाही केली तर दमदाटी केली जाते. त्यामुळे अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. २०१७ मध्ये चुकीचे बटन दाबून चूक केली होती, त्या चुकीची पुनरावृत्ती करू नका.