कनेक्शन तोडल्याने ऑफिसची तोडफोड करत महावितरणच्या कर्मचाऱ्यास केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 20:53 IST2021-10-29T20:50:20+5:302021-10-29T20:53:59+5:30
हा प्रकार गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमिटेडच्या थरमॅक्स चौक, चिंचवड येथील कार्यालयात घडला.

कनेक्शन तोडल्याने ऑफिसची तोडफोड करत महावितरणच्या कर्मचाऱ्यास केली मारहाण
पिंपरी : वीज कनेक्शन तोडल्याने सहाजणांनी मिळून महावितरणच्या कार्यालयात तोडफोड केली. महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवून नेले. हा प्रकार गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमिटेडच्या थरमॅक्स चौक, चिंचवड येथील कार्यालयात घडला.
रूपेश गोविंदन नामबियार (वय ३५, रा. आकुर्डी), रियाज जिलानी मोहोळकर (३२, रा. बिजलीनगर, चिंचवड), रिजवान अशफाक शेख (३२, रा. काळभोरनगर, चिंचवड), फैज निजाम सय्यद (३२, रा. भोईर कॉलनी, चिंचवड), मोहसीन मकसूद भालदार (३०, रा. सुदर्शन नगर, चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. यांच्यासह अरबाज हारूण शेख (२९, रा. आकुर्डी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राहुल खंडेराव जाधव (वय ३०, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमिटेडमध्ये काम करतात. त्यांनी आरोपी रूपेश नामबियार याचे लाईट कनेक्शन तोडले. याचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली. तसेच फिर्यादी जाधव यांना शिवीगाळ, धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जाधव यांना आरोपींनी त्यांच्या गाडीत बळजबरीने बसवून नेले.