Maharashtra Election 2019 BJP Pankaja Munde rally in thergaon Pimpri-Chinchwad | Maharashtra Election 2019 : पंकजा मुंडेंच्या सभेत नागरिकांचा गोंधळ, पोलिसांनी ताब्यात घेतलं!

Maharashtra Election 2019 : पंकजा मुंडेंच्या सभेत नागरिकांचा गोंधळ, पोलिसांनी ताब्यात घेतलं!

ठळक मुद्देअवैध बांधकामे, रिंग रोड, शास्तीकराच्या मुद्यावरून पंकजा मुंडे यांच्या सभेत नागरिकांनी गोंधळ घातला. गोंधळ सुरू असताना देखील पंकजा मुंडे यांनी भाषण सुरूच ठेवले.पोलिसांनी तत्काळ घोषणा देणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. 

पिंपरी - पंकजा मुंडे यांच्या सभेत रविवारी (13 ऑक्टोबर) नागरिकांनी गोंधळ घातला आहे. शहरातील अवैध बांधकामे, रिंग रोड आणि शास्तीकर या मुद्द्यांकडे रहिवाशांनी ग्रामविकासमंत्री, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे रहिवासी दुसऱ्या पक्षाने पाठविल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. यावेळी अवैध बांधकामे, रिंग रोड, शास्तीकराच्या मुद्यावरून पंकजा मुंडे यांच्या सभेत नागरिकांनी गोंधळ घातला. पोलिसांनी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारानिमित्त आज (13 ऑक्टोबर) पंकजा मुंडे यांची थेरगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती.  यावेळी खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे उपस्थित होते.

पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असताना सभेतील काही महिलांसह नागरिकांनी पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामे, रिंग रोड आणि शास्तीकर या मुद्द्यांकडे मुंडे यांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. रिंगरोडचा प्रश्न सुटला पाहिजे. तसेच रिंग रोडमुळे अनेकांची घरे बाधित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे असे म्हणतात. इथे मात्र आमच्या घरांवर हातोडा मारून आम्हाला बेघर केले जात आहे. अवैध बांधकामे, शास्तीकर 100 टक्के रद्द झाला पाहिजे अशी सभेला उपस्थित असलेल्या महिलांनी मागणी केली. त्यामुळे स्टेजवरील स्थानिक नेते मंडळी देखील अवाक झाले. भांबावून गेले. 

गोंधळ सुरू असताना देखील पंकजा मुंडे यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. तुमच्यावर दुसऱ्या पक्षाची छाप आहे असा आरोप मुंडे यांनी करताच आम्ही कोणत्या पक्षाचे नसल्याचे नागरिकांनी त्यांना ठणकावून सांगत आम्हाला कोणी पाठविले नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर शांत राहा... शांत राहा... लोकशाहीत हे घडणे अपेक्षित आहे. घराचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घोषणा देणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. 
 

Web Title: Maharashtra Election 2019 BJP Pankaja Munde rally in thergaon Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.