Zilla Parishad Election : हिंजवडी जिल्हा परिषद गटात राज्यातील सर्वाधिक मतदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 14:28 IST2025-11-28T14:23:23+5:302025-11-28T14:28:45+5:30
- मतदारसंख्या तब्बल ७५ हजारांवर : राज्यातील सर्वांत लहान आठ जिल्हा परिषद गटांच्या एकत्रित मतदार संख्येपेक्षा जास्त मतदार

Zilla Parishad Election : हिंजवडी जिल्हा परिषद गटात राज्यातील सर्वाधिक मतदार
पिंपरी : जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या पुणे जिल्हा परिषदेच्या हिंजवडी (सर्कल क्र. ३५) गटामध्ये आहे. अंतिम मतदार यादीनुसार या गटामध्ये तब्बल ७५,६५० मतदार नोंदले गेले असून ही संख्या राज्यातील सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, या एकाच गटाची मतदारसंख्या राज्यातील सर्वांत लहान असलेल्या आठ जिल्हा परिषद गटांच्या एकत्रित मतदारसंख्येपेक्षा जास्त आहे.
दरम्यान, मतदार यादीची तयारी भारतीय निवडणूक आयोग करतो. राज्य निवडणूक आयोगाने केवळ ही यादी विभागून गटनिहाय वाटप केले असून, कोणतेही बदल केलेले नाहीत, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दिली.
हिंजवडीत ५९३६ दुबार मतदार
हिंजवडी गटात पुरुष मतदार ४३ हजार ९६४, तर महिला मतदार ३१ हजार ६८२ आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या चार नोंदली गेली आहे. यादीत ५९३६ दुबार नावे आढळली आहेत.
साडेसहा हजार मतदारांचे घर क्रमांक गायब
निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये घर क्रमांकाच्या नोंदींमध्ये ६५०० मतदारांच्या नावासमोर ‘उपलब्ध नाही’ अशी नोंद आहे. ४९ मतदारांच्या नावांसमोर ०० तर ४३० मतदारांच्या नावासमोर ० अशी विसंगतीही दिसून येते.
‘जेन झी’ मतदारसंख्या १६ हजार
हिंजवडी गटामध्ये युवा मतदारांचीही लक्षणीय संख्या असून १६ हजार १४१ ‘जेन झी’ मतदार आहेत. यावेळी प्रथमच मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होणारे ७४४ नवमतदार आहेत.