अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 10:08 IST2025-12-29T10:07:46+5:302025-12-29T10:08:41+5:30
तळवडेत राष्ट्रवादीची सभा, महापालिकेतील भाजप सत्ताकाळातील भ्रष्टाचारावर केली टीका

अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) व राष्ट्रवादी (शरद पवार) हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत. दोन दिवसांत अधिकृत घोषणा होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि. २८) केली. तळवडे येथे आयोजित जाहीर सभेत अजित पवार यांनी ही घोषणा करत शहरातील सर्व प्रश्न एकत्रितपणे सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला.
राष्ट्रवादी (अजित पवार) ने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. भाजपवर टीका करताना अजित पवार म्हणाले, ' 'मी काही जणांना पक्ष का सोडला, असे विचारले असता त्यांनी थेट सांगितले की 'दम दिला जात होता'. अशा पद्धतीचे राजकारण चुकीचे आहे. ही गुंडगिरी पिंपरी-चिंचवडकरांनी खपवून घेता कामा नये,' असा स्पष्ट इशाराही अजित पवार यांनी यावेळी दिला.
'२०१७ पासून महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला'
अजित पवार म्हणाले, 'आज शहरात पाण्याची मोठी समस्या आहे. पवना बंद जलवाहिनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. रेडझोनचा गंभीर प्रश्नही सोडवायचा आहे. २०१७ पासून महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. अनेक कामांमध्ये रिंग केली जाते. ठरावीक लोकांनाच डोळ्यांसमोर ठेवून कंत्राटे दिली जातात. महापालिकेवर मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा वाढला आहे.
अजित पवार म्हणाले, "मी विकास केला, रस्ते केले, फ्लायओव्हर बांधले. तुम्ही पाच वर्षात काय केलं ते सांगा. रस्ते सफाईसाठी कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या, पण प्रत्यक्षात रस्ते धूळ खात पडले आहेत. या निविदा शहरासाठी होत्या की ठेकेदारांना पोसण्यासाठी? पिंपरी-चिंचवड शहर दोघांनी वाटून घेतलं आहे."
'ठेकेदार पोसण्याचे काम'
शहरात ठेकेदार पोसण्याचे राजकारण सुरू असून, महापालिका कर्जबाजारी होण्यास सत्ताधाऱ्यांची धोरणे जबाबदार असल्याचा घणाघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. नाव न घेता शहरातील भाजप आमदारावर टीका केली. "मी शब्दाचा पक्का आहे, मी कामाचा माणूस आहे. संधी मिळाली तर महापालिकेला कर्जातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही," असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
'दहशतीचे वातावरण'
पवार म्हणाले, 'आज दहशतीचे वातावरण आहे. गुंडगिरी करून लोकांना धमकावले जात आहे. माझ्या इतक्या वर्षाच्या राजकारणात मी कधीही फोडाफोडीचे राजकारण केले नाही. मात्र, सध्या 'याला फोड, त्याला फोड' असा प्रकार सुरू आहे.