मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आमदार अण्णा बनसोडे यांची भेट; राष्ट्रवादीमध्ये अस्वस्था?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 20:44 IST2023-06-16T20:39:36+5:302023-06-16T20:44:27+5:30
राष्ट्रवादीत बनसोडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सदिच्छा भेट की बनसोडे यांना शिवेसेनेत आणण्याचे प्रयत्न?...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आमदार अण्णा बनसोडे यांची भेट; राष्ट्रवादीमध्ये अस्वस्था?
- विश्वास मोरे
पिंपरी : कोणताही नियोजित कार्यक्रम नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अण्णा बनसोडे यांची शुक्रवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास भेट घेतली. त्यानंतर काहीच क्षणात मुख्यमंत्र्यांसह खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे,बनसोडे यांचे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले. राष्ट्रवादीत बनसोडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सदिच्छा भेट की बनसोडे यांना शिवेसेनेत आणण्याचे प्रयत्न? याबाबतची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे. दरम्यान ‘‘ही भेट राजकीय नव्हती, असे आमदार बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित ‘‘शासन आपल्या दारी उपक्रम’’ आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री शिंदे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर होते. सुरूवातीला थेरगाव येथे शासन आपल्या दारी आणि त्यानंतर बसवेश्वर महाराज पुतळा अनावरण झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या काळभोरनगर येथील कार्यालयाकडे वळाला. सव्वासातच्या सुमारास बनसोडे यांच्या कार्यालयात पोहोचला. त्यावेळी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे उपस्थित होते. त्यानंतर काहीकाळ बनसोडे यांच्या केबीनमध्ये चौघेजण थांबल होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आमदार बनसोडे यांचा गट नाराज असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. त्यामुळे भेटीविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्वस्थेवर शिक्कामोर्तब
गेल्या अनेक महिन्यांपासून पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्था आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यक्रमांतही अनेक पदाधिकारी उपस्थित राहत नाहीत. मुख्यमंत्री आणि बनसोडे यांची भेट झाली. त्यातून बनसोडे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगली आहे. भेटीचे अनेक तर्क आणि विर्तक लावले जात आहेत. दरम्यान या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका वैशाली काळभोर, प्रसाद शेट्टी, शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे, मीनल यादव आदीही उपस्थित होते. यावेळी आमदारांनी विविध पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्याचे स्वागत केले. दरम्यान ही भेट राजकीय नसल्याचे आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे हे चांगले मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आमच्या मतदार संघातील अनेक प्रश्न तातडीने सोडविले आहेत. आज निगडी येथे कार्यक्रमासाठी आले अशाताना मी त्यांना कार्यालयात येण्याची विनंती केली. आमची कोणतीही चर्चा झाली नाही. मी नाराज नाही. भेटीचे राजकीय अर्थ लावू नयेत.
- अण्णा बनसोडे (आमदार )