Chinchwad By Election | "भाजपने महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का देऊन बिहार बनवला"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 10:00 IST2023-02-25T09:59:29+5:302023-02-25T10:00:31+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी प्रचाराची सांगता म्हणून अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली...

Chinchwad By Election | "भाजपने महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का देऊन बिहार बनवला"
पिंपरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर हल्ला झाला. अशी गुन्हेगारी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये होत असल्याचे आपण ऐकून होतो. महाराष्ट्राच्या सुसंस्कृततेला धक्का लावून भाजपने बिहार बनवू लागले आहेत, असा आरोप विधानसभेचे विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी प्रचाराची सांगता म्हणून अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी निरीक्षक आमदार सुनील शेळके, उमेदवार नाना काटे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, योगेश बहल, संजोग वाघेरे, रविकांत वर्पे, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ उपस्थित होते.
पवार म्हणाले, चिंचवड आणि कसबा मतदारसंघात पराभव दिसत असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तळ ठोकून आहेत. शिवसेनेच्या नावाचे व चिन्हाचे अपहरण केल्याचा सामान्यांना राग आहे. निवडणूक आयोगाचा हा वादग्रस्त निर्णय जनतेला मान्य नाही. त्यामुळे या पोटनिवडणुकीत जनता आपली नाराजी व्यक्त करील.
नाना काटेंच्या विजयासाठी महिलांचा निर्धार
राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या पत्नी शीतल काटे यांनी शुक्रवारी काढलेल्या रॅलीला प्रतिसाद लाभला. मतदारसंघाच्या विकासासाठी नाना काटेंनाच निवडून आणण्याचा निर्धार रॅलीत सहभागी महिलांनी केला.