PCMC Election 2026: पायाखालची वाळू सरकल्यामुळे अजित पवारांकडून खोटे ‘नरेटिव्ह’; भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी लगावला टोला
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 4, 2026 17:36 IST2026-01-04T17:32:35+5:302026-01-04T17:36:50+5:30
PCMC Election 2026 - पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला; पक्षावरील आरोपांचा घेतला समाचार; निधी थेट मिळवायचा असेल तर भाजपला निवडण्याचे आवाहन

PCMC Election 2026: पायाखालची वाळू सरकल्यामुळे अजित पवारांकडून खोटे ‘नरेटिव्ह’; भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी लगावला टोला
पिंपरी : महापालिका निवडणुकीत पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते खोटे ‘नरेटिव्ह’ पसरवत आहेत. ते एजन्सीने दिलेले स्क्रिफ्ट वाचतात. एजन्सीने सांगितलेले कपडे घालतात. एजन्सीज भाड्याने घ्यायच्या आणि हजार-दोन हजार लोकांना कंपन्यांमध्ये बसवून ट्रोल करायला पैसे द्यायचे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. पवार केंद्रात आणि राज्यात आमच्याशी जोडलेले आहेत. त्यामुळे निधी थेट मिळवायचा असेल तर भाजपला निवडा, असे आवाहनही त्यांनी केले.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा नारळ शनिवारी (दि.३) प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते निगडीमध्ये फोडण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत भाजपवर अनेक आरोप केले होते. त्या आरोपांचा चव्हाण यांनी समाचार घेतला.
चव्हाण म्हणाले की, केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. पिंपरी-चिंचवडला निधीची कमतरता पडणार नाही. चुकीच्या व्यक्तीच्या हातात सत्ता जाणे म्हणजे पाच वर्षे वाटोळे करून घेणे आहे. भाजपची विचारधारा पारदर्शक आहे. त्यामुळे कोणी काही म्हटले तरी शहरातील नागरिकांना माहिती आहे. वर्षानुवर्षांचा त्यांचा कारभार जनतेने पाहिला आहे. त्यामुळे आता महापौर भाजपचाच असेल. यावेळी आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, राहुल कलाटे आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष, सेटिंग करू नका..!
पॅनेलच्या बाहेर जाऊन कोणी प्रचार करू नये. प्रत्येकाने पॅनेलमध्ये प्रचार करावा. ‘शायनिंग’ मारत बसू नका. बापू, पॅनेलमधील चारही उमेदवार निवडून आले पाहिजेत. सेटिंग करू नका, अशी तंबी चव्हाण यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना दिली.
अजित पवार यांना सोबत घेतल्याचा पश्चात्ताप?
चव्हाण म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटले होते, की अजित पवारांना सोबत घेताना विचार करा. अजित पवारांना युतीत घेतल्याचा पश्चात्ताप होत असल्याचे कार्यकर्ते मला रोज सांगतात. प्रदेशाचा मी अध्यक्ष आहे, त्यामुळे कार्यकर्ते मला हे सांगण्याचा प्रयत्न करतात.
पैलवानाच्या नादी लागायचे नसते!
‘काल पत्रकार परिषदेत बरेच काही आरोप करण्यात आले; पण मी एकच सांगतो की, पैलवानाच्या नादी लागायचे नसते. महेश लांडगे पैलवानकी अजून सुरू आहे ना?’ असे आमदार लांडगे यांच्याकडे बघत चव्हाण यांनी अजित पवार यांना इशारा दिला.
राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक ॲड. संदीप चिंचवडे, राजेंद्र साळुंखे, सुषमा तनपुरे, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर, संदीप वाल्हेकर यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.