Pimpri Chinchwad Police: मतमोजणीसाठी साडेसातशे पोलिसांचा फौजफाटा; पिंपरी-चिंचवड पोलिस सज्ज
By नारायण बडगुजर | Updated: November 22, 2024 15:08 IST2024-11-22T15:07:36+5:302024-11-22T15:08:59+5:30
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियमित गस्तीसह साध्यावेशातील पोलिस देखील मतमोजणी केंद्र परिसरात राहणार

Pimpri Chinchwad Police: मतमोजणीसाठी साडेसातशे पोलिसांचा फौजफाटा; पिंपरी-चिंचवड पोलिस सज्ज
पिंपरी : सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ प्रक्रिया अंतिम टप्पात आली आहे. या प्रक्रियेत शनिवारी (दि. २३) मतमोजणी होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत तीन ठिकाणी स्टॉगरुम व मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी थेरगाव येथील पिंपरी-चिंचवड मनपा कर्मचारी महासंघ संचलित स्वर्गीय शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे होणार आहे. पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील श्री. शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे.
स्ट्राँगरुम व मतमोजणीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पोलिसांना सूचना केल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियमित गस्तीसह साध्यावेशातील पोलिस देखील मतमोजणी केंद्र परिसरात राहणार आहेत. उमेदवारांच्या घर तसेच कार्यालयासाठी देखील बंदोबस्त राहणार आहे.
असा असेल पोलिस बंदोबस्त
सह आयुक्त : १
अपर आयुक्त : १
उपायुक्त : ४
सहायक आयुक्त : ५
पोलिस निरीक्षक : २९
सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक : ६४
पोलीस अंमलदार : ६५६
राज्य राखीव दलाची कंपनी : १
केंद्र सुरक्षा दलाच्या कंपनी : ४
हरियाणा पोलिस कंपनी : १