'हे' आहेत देशातील टॉप 10 श्रीमंत खासदार; संपत्ती वाचून व्हाल धक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 02:21 PM2024-06-13T14:21:42+5:302024-06-13T14:31:00+5:30

देशातील सर्वात श्रीमंत खासदारांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात आहे.

नवी दिल्ली : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. यावेळी लोकसभेवर निवडून आलेल्या ५४३ खासदारांपैकी ५०३ खासदार कोट्यधीश आहेत. या सर्व खासदारांची संपत्ती किमान एक कोटी रुपयांची आहे. देशातील सर्वात श्रीमंत खासदारांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात आहे. अशाच देशातील या दहा सर्वात श्रीमंत खासदारांची माहिती जाणून घेऊया...

आंध्र प्रदेशातील गुंटूरमधून तेलुगु देसम पक्षाच्या तिकिटावर डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी विजय मिळवला आहे. मोदी सरकारमध्ये ते ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालयात राज्यमंत्रीही झाले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५७०५ कोटी रुपये आहे. यासोबतच ते या संसदेचे सर्वात श्रीमंत खासदार आहेत.

कोंडा विश्वेश्वर रेड्डी भाजपच्या तिकीटावर तेलंगणातील चेल्लेवा मतदारसंघातून खासदार झाले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भारत राष्ट्र समितीच्या तिकिटावर याच जागेवरून विजय मिळवला होता. दरम्यान, कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी प्रतिज्ञापत्रात आपली एकूण संपत्ती ४,५६८ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत.

भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचे पुत्र नवीन जिंदाल हे कुरुक्षेत्र मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकले आहेच. जिंदाल स्टील आणि पॉवरचे चेअरमन नवीन जिंदाल यांची एकूण संपत्ती १२४१ कोटी रुपये आहे. या लोकसभेचे ते तिसरे सर्वात श्रीमंत खासदार ठरले आहेत. यापूर्वीही ते दोनदा खासदार झाले आहेत.

प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी हे व्हीपीआर मायनिंग इंफ्राचे संस्थापक आहेत. त्यांची एकूण संपत्ती ७१६ कोटी रुपये आहे. तेलुगु देसम पक्षाच्या तिकिटावर त्यांनी आंध्र प्रदेशातील नेल्लोर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. १८ व्या लोकसभेतील ते चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत.

भाजप नेते सीएम रमेश हे यापूर्वी आंध्र प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशातील अनकापल्ली मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. ते पूर्वी तेलगू देसम पार्टीसोबत होते. त्यांची एकूण संपत्ती ४९७ कोटी रुपये आहे.

भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचे भारतीय राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे. त्यांचे वडील आणि ते स्वतः काँग्रेसमध्ये बरीच वर्षे होते. त्यांची एकूण संपत्ती ४२४ कोटी रुपये आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. मागील मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांना यावेळी दूरसंचार मंत्री करण्यात आले आहे.

छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या राजघराण्यातील आहेत. त्यांची संपत्ती ३४२ कोटी रुपये आहे. लोकसभा निवडणुकीत ते महाराष्ट्रातील कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले.

श्रीभरत मथुकुमिली विशाखापट्टणममधून तेलुगु देसम पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. त्यांची एकूण संपत्ती २९८ कोटी रुपये आहे. गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे ते अध्यक्ष आहेत.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे. त्यांची संपत्ती २७८ कोटी रुपये आहे.

डॉ. प्रभा मल्लिकार्जुन या काँग्रेसच्या नेत्या आहेत. कर्नाटकातील देवनागिरी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली आहे. व्यवसायाने डेंटिस्ट असलेल्या प्रभा मल्लिकार्जुन यांचा विवाह कर्नाटकातील मंत्री एसएस मल्लिकार्जुन यांच्याशी झाला आहे. त्यांची संपत्ती २४१ कोटी रुपये आहे.