तिरुपति बालाजी मंदिर: ३ लाख कोटी संपत्ती, २५००० किलो चांदी, रोज ३ कोटी दान; आकडे करतील अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:02 IST2025-01-09T17:54:07+5:302025-01-09T18:02:38+5:30
How rich Tirumala Tirupati Balaji Temple: १३ हजार किलो सोने असलेल्या तिरुमला तिरुपति बालाजी मंदिरात जाऊन व्यंकटेश्वराचे दर्शन लाखो भाविक दररोज घेतात. सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या देवस्थानची नेमकी श्रीमंती किती? थक्क करणारी आकडेवारी पाहाच...

गेल्या काही महिन्यांपासून तिरुमला तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर मंदिर सातत्याने चर्चेत आहे. लाडू प्रसादमचा वाद शमतो न शमतो या मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त आहे. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. तिरुमला तिरुपति देवस्थानम म्हणजेच TTD या मंदिराचे व्यवस्थापन करते. परंतु, तिरुपमला तिरुपति बालाजी वैंकटेश्वर मंदिर धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टींसाठी जेवढे रहस्यमयी, अद्भूत, वास्तूरचनेचे अप्रतिम उदाहरण आहे, तसेच ते दान-धर्म कार्य आणि कमाईसाठी प्रसिद्ध आहे.
तिरुपमला तिरुपति बालाजी मंदिरात रोख रक्कम, सोने, चांदी आणि हिरे आणि रत्नांचा मोठा साठा आहे. यामुळेच हे मंदिर जगातील सर्वांत श्रीमंत धार्मिक स्थळांपैकी एक असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात दररोज लाखो भाविक दर्शनसाठी येतात. केवळ भारतातून नाही, तर परदेशातील अनेक ठिकाणांहून बालाजी दर्शनासाठी भाविक, पर्यटक येत असतात. तिरुपती व्यंकटेश्वर तसेच देवी पद्मावती यांवर कोट्यवधी भाविकांची निस्सीम श्रद्धा आहे.
तिरुपति बालाजी मंदिरात दररोज २ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दान मिळते. मोठ्या उत्सवात किंवा धार्मिक कार्यक्रमांवेळी ही रक्कम ३ते ४ कोटी रुपयांपर्यंत सहज पोहोचते. भाविक सोने, चांदी, रोख रक्कम आणि अगदी जमीन आणि शेअर्स यासारख्या मौल्यवान भेटवस्तू देतात. सन २०२२ मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानमने त्यांची एकूण मालमत्ता सुमारे २.५ लाख कोटी रुपये असल्याचे घोषित केले होते. अलीकडच्या काळात त्यात कमालीची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
तिरुपति बालाजी व्यंकटेश्वर मंदिरात सुमारे ११,३२९ किलो सोने आहे, ज्याची किंमत सुमारे १८ हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर, मंदिर ट्रस्टकडे सुमारे २५ हजार किलो चांदी आहे, जी भक्तांनी दान केली आहे. त्याच वेळी, जर आपण दागिन्यांबद्दल बोललो तर, मंदिर ट्रस्टकडे शेकडो हिरे आणि मोत्यांचे दागिने आहेत. तसेच देवतांच्या दागिन्यांचा हिशोब जमेस धरल्यास हा आकडा सहज १३ हजार किलोपेक्षा जास्त होतो, असे म्हटले जाते.
इतकेच नाही, तर याशिवाय बालाजी मंदिर ट्रस्टकडे वेगवेगळ्या बँकांमध्ये १३ हजार २८७ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत, ज्यावर दरवर्षी १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळते. २०२३ मध्ये ट्रस्टने १ हजार १६१ कोटी रुपयांची नवीन एफडी केली होती. तिरुपती बालाजीचे भक्त केवळ रोख रक्कमच नव्हे तर जमीन, सोने-चांदी आणि अगदी शेअर्स देखील दान करतात. काही वर्षांपूर्वी, दक्षिण भारतीय अभिनेत्रीने १५ कोटी रुपयांची जमीन दान केली होती. एका भक्ताने त्यांची मालमत्ता ट्रस्टकडे हस्तांतरित केली.
तिरुपती मंदिर ट्रस्ट दरवर्षी लाडू प्रसाद म्हणून विकून सुमारे ५०० कोटी रुपये कमावते. याशिवाय, ट्रस्ट तिरुपतीमधील भक्तांनी दान केलेल्या केसांचा लिलाव करते. २०१८ मध्ये १,८७,००० किलो केस विकून मंदिर ट्रस्टने १.३५ कोटी रुपये कमावले होते, असे सांगितले जाते.
तिरुमला तिरुपती मंदिराच्या अनेक अद्भूत गोष्टी सांगितल्या जातात. तसेच अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत. कुबेरकडे इतकी संपत्ती आहे की स्वतः भगवान विष्णूनेही एकदा त्याच्याकडून कर्ज घेतले होते, तेही देवी लक्ष्मीशी लग्न करण्यासाठी. कर्ज घेताना, विष्णूने सांगितले होते की, कलियुगाच्या अखेरीस व्याजासह त्याचे सर्व कर्ज फेडेल. या कर्जातून, भगवान विष्णूचे वेंकटेश रूप आणि देवी लक्ष्मीचा अवतार पद्मावती यांचा विवाह झाला. या श्रद्धेमुळे, आजही भक्त भगवान विष्णूचे अवतार तिरुपती बालाजी यांना मोठ्या प्रमाणात सोने, चांदी, हिरे, मोती आणि दागिने अर्पण करतात, जेणेकरून भगवान कर्जमुक्त होतात, असे सांगितले जाते.
धार्मिक श्रद्धेनुसार, दरवर्षी हिवाळ्यात कुबेर देव तिरुपती बालाजीला जातात आणि कर्ज वसूल करतात. यानंतर ते बद्रीनाथला परततात. सध्या तिरुपती बालाजीची एकूण संपत्ती सुमारे ३ लाख कोटी रुपये आहे, ज्यामध्ये त्यांच्या जंगम आणि अचल मालमत्तेचा समावेश आहे, असा दावा केला जाते. भगवान वेंकटेश्वर यांना व्यंकटेश्वर, गोविंद किंवा तिरुपति तिम्मप्पा या नावांनीही ओळखले जाते. तिरुपती देवस्थानमच्या नोंदीनुसार, भगवान बालाजीच्या नावाने विविध बँकांमध्ये ११,२२५ किलो सोने ठेवले आहे, जे त्यांना भक्तांकडून दान म्हणून मिळाले आहे.
तिरुपति बालाजी मंदिराकडे ६ हजार एकर वनजमीन आहे. ७५ ठिकाणी ७,६३६ एकरची स्थावर मालमत्ता आहे. एवढेच नाही तर त्यांच्याकडे १,२२६ एकर शेती आणि ६४०९ एकर बिगर शेती जमीन आहे. देशभरात तिरुपतीशी संबंधित ५३५ मालमत्ता आणि ७१ मंदिरे आहेत, त्यापैकी १५९ मालमत्ता भाडेपट्ट्याने देण्यात आल्या आहेत. यातून वार्षिक ४ कोटी रुपये उत्पन्न मिळते. मंडपम भाड्याने देऊन तेवढीच रक्कम कमावली जाते. दरवर्षी भाविकांकडून १ हजार ०२१ कोटींपेक्षा देणग्या म्हणून मिळतात.
२०२२ च्या आकडेवारीवरून असेही दिसून येते की तिरुमला येथील भगवान बालाजीच्या हुंडीचे वार्षिक उत्पन्न १,४०० कोटी रुपये आहे. सर्वांचा आवडता तिरुपती लाडू ३१० वर्षांपासून प्रसाद म्हणून मिळतो. तिरुपती लाडूला जीआय टॅग मिळाला आहे. हा लाडू जगातील सर्वात श्रीमंत भगवान वेंकटेश्वराचा प्रसाद आहे. याला श्री वारी लाडू असेही म्हणतात.
टीटीडी तिरुमला येथे दररोज सुमारे ३ लाख लाडू तयार करते आणि ते भाविकांना वाटते. ट्रस्टला दरवर्षी फक्त लाडूंच्या विक्रीतून सुमारे ५०० कोटी रुपये मिळतात. तिरुमला तिरुपती देवस्थानम लाडू पोट्टू येथे दररोज सरासरी ३ लाख लाडू तयार करते. सध्या, पोटूमध्ये दररोज ८ लाख लाडू बनवण्याची क्षमता आहे. यासाठी सुमारे ६२० जण दिवस-रात्र काम करत असतात.
दरम्यान, तिरुमला मंदिरात येणाऱ्या भाविकांची दीर्घ प्रतीक्षा सोपी आणि आनंददायी करण्यासाठी टोकन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. तिरुमलामध्ये लांब रांगा ही नेहमीच एक मोठी समस्या राहिली आहे, ज्याचे निराकरण करण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) तज्ज्ञ आणि वेळ व्यवस्थापन सल्लागारांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नवीन योजना लागू केली आहे.
याअंतर्गत, कोणतीही व्यक्ती ५० रुपयांचे टोकन घेऊन दर्शन घेऊ शकते. मात्र, या टोकन अंतर्गत दर्शन घेण्यासाठी एका दिवसापेक्षा जास्त वेळ लागतो. कधीकधी गर्दीमुळे दर्शन घेण्यासाठी २-३ तीन दिवसांचा वेळ लागतो. ५० रुपयांच्या टोकननंतर आणखी एक व्यवस्था आहे. जी व्हीआयपी श्रेणीमध्ये ठेवण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये, ३०० रुपयांचे व्हीआयपी टोकन खरेदी करावे लागते आणि या प्रणालीमध्ये जलद दर्शनाची शक्यता असते. ३०० रुपयांच्या प्रणाली अंतर्गतही आगाऊ बुकिंग करता येते.
मंदिर व्यवस्थापनाने दर्शनासाठी काही नियमही बनवले आहेत. याशिवाय, वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी विशेष दर्शनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. हे विशेष दर्शन अपंग आणि वृद्ध यात्रेकरूंसाठी (६५ वर्षांवरील) आहे, जे मंदिराजवळील स्वतंत्र प्रवेशद्वारातून दर्शन घेऊ शकतात.
या श्रेणीतील यात्रेकरूंना दररोज दोन वेगवेगळ्या स्लॉटमध्ये प्रवेश दिला जातो. एक सकाळी १० वाजता आणि दुसरा दुपारी ३ वाजता. यासाठी १४०० टोकन दिले जात आहेत. शुक्रवार आणि बुधवारी, फक्त दुपारी ३ वाजताच्या स्लॉटसाठी १००० टोकन दिले जातात.