तिरुपतीला भक्तानं अर्पण केली ५ किलो वजनाची १ कोटी रुपयांची सुवर्ण तलवार, फोटो पाहून डोळे दिपतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 06:37 PM2021-07-20T18:37:45+5:302021-07-20T18:43:50+5:30

देवावरच्या विश्वासापोटी भक्त लाखमोलाचं अर्पण केल्याच्या बातम्या आपण आजवर अनेकदा पाहिल्या किंवा वाचल्या आहेत. अशाच एका भक्तानं तिरुपती मंदिरात केलेलं दान सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

हैदराबादमधील एका भक्तानं तिरुपतीमधील तिरुमला मंदिरात भगवान व्यंकटेश्वरला तब्बल ५ किलोची सोनं अन् चांदीची तलवार अर्पण केली आहे.

हैदराबादच्या श्रीनिवास दाम्पत्यानं दोन किलो सोनं आणि तीन किलो चांदीनं तयार केलेली सुवर्ण तलवार तिरुपती मंदिरात अर्पण केली आहे. याची एकूण किंमत तब्बल १ कोटींच्या घरात आहे.

श्री व्यंकटेश्वर मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये तिरुमालाच्या डोंगराळ भागात वसलेलं आहे. देशातील सर्वाधिक दान होणारं मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे.

देशासह संपूर्ण जगभरातून लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. कोरोनाामुळे गेले अनेक महिने दर्शन बंद असल्यानं अनेक भाविकांना मंदिराला भेट देता आली नव्हती.

श्रीनिवास कुटुंबियांनाही सुवर्ण तलवार गेल्या वर्षीच अर्पण करायची होती. पण कोरोनामुळे देवस्थान बंद असल्यानं त्यांना हे शक्य होऊ शकलं नाही. अखेर आज त्यांनी सुवर्ण तलवार अर्पण केली.

तामिळनाडूच्या कोईम्बतूरस्थित एका ज्वेलर्सनं या सुवर्ण तलावारीचं डिझाइन तयार केलं आहे. ही तलवार तयार करण्यासाठी जवळपास ६ महिन्यांचा कालावधी लागला आहे.

यापूर्वी, तामिळनाडूच्या तेनी येथील सुप्रसिद्ध कापड व्यापारी थांगा दोराई यांनी २०१८ मध्ये भगवान व्यंकटेश्वराला १.७५ कोटींची सोन्याची तलवार दान केली होती. यासाठी सुमारे सहा किलो सोन्याचा वापर केला गेला होता.