मनसुख हिरेन यांना मधल्या सीटवर बसवलं, त्यानंतर तोंड-नाक दाबलं; मृत्यू झाल्यानंतर पोटभरून खाल्लं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 10:54 AM2021-09-12T10:54:31+5:302021-09-12T14:04:03+5:30

मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एनआयएच्या चार्जशीटमधून रोज नवनवी माहिती समोर येत आहे.

ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला पैसे दिल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपपत्रात केला आहे.

एनआयएने अँटालिया स्फोटके प्रकरणी दाखल केलेल्या 10 हजार पानी आरोपपत्राला साक्षीदारांच्या जबाबांचीही प्रत जोडण्यात आली आहे. हिरेन कसा दिसतो, हे दाखवण्यासाठी सचिन वाझे याने 2 मार्च रोजी हिरेन यांना एका बैठकीत बोलावले. त्या बैठकीत प्रदीप शर्मा, सुनील माने हे उपस्थित होते.

मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एनआयएच्या चार्जशीटमधून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. मनसुख हिरेनची हत्या केल्यानंतर चार आरोपींनी ठाण्यातील एका ढाब्यावर जाऊन पोठभर जेवण केलं होतं असं एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये नोंदवलं आहे. आनंद जाधव, संतोष शेलार, मनीष सोनी आणि सतीश मोतकुरी उर्फ टन्नी या चार आरोपींची नोंद एनआयएने केली आहे.

आरोपी आनंद जाधवने एनआयएला दिलेल्या जबाबात सांगितलं आहे की, त्याने इतर तीन आरोपींच्या मदतीने 4 मार्चला मनसूख हिरेनची हत्या केली. त्या आधी 3 मार्चला त्या ठिकाणची रेकी करण्यात आली होती. 4 मार्चला मनीष सोनीच्या लाल रंगाच्या तवेरातून ते घोडबंदर रोडवरुन ठाण्याच्या दिशेने गेले.

ठाण्यामध्ये आल्यानंतर मनसुख हिरेन या लाल तवेरामध्ये मधल्या सीटवर बसला. थोड्या वेळाने सतिश मोतकुरी याने मनसुखचे तोंड दाबले आणि तोंडात रुमाल कोंबला. इतरांनी त्याचे नाक दाबले जेणेकरुन त्याला श्वास घेता येणार नाही. दहा ते पंधरा मिनीटांनी त्याचा मृत्यू झाला असं लक्षात आल्यानंतर गाडी सुरु केली, कसेली पुलावर पोहोचतात त्याचा मृतदेह खाडीमध्ये फेकण्यात आला असं आनंद जाधवने आपल्या जबाबात सांगितलं आहे.

मनसुख हिरेनची हत्या झाल्यानंतर आरोपींनी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदिप शर्मा यांना फोन लावला आणि तिकडून केवळ ओके असं उत्तर आलं. त्यानंतर सर्व आरोपी ठाण्यातील काठियावाडी ढाब्यावर गेले आणि पोटभरुन जेवण केल्याचं एनआयएच्या चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं आहे.