Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:52 IST2026-01-01T16:43:50+5:302026-01-01T16:52:55+5:30
Municipal Election Result 2026 BJP: २९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाने मतदानाआधीच विजयाचे खाते उघडले आहे. भाजपाचे आतापर्यंत १० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

BJP Municipal Election 2026 Winners List
महापालिका निवडणुकीत भाजपाने मतदानापूर्वीच दहा जागांवर विजय मिळवला. कल्याण डोंबिवली, धुळे, पनवेल, भिवंडी या महापालिकांमध्ये भाजपाचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवीद्र चव्हाण यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कल्याण-डोंबिवलीमध्येच भाजपाचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर पनवेल, भिवंडीतही भाजपाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाच्या रेखा चौधरी प्रभाग क्रमांक १८, आसावरी नवरे प्रभाग क्रमांक २६ क आणि प्रभाग क्रमांक २६ ब मधून रंजना पेणकर या विजयी झाल्या आहेत. अर्ज छाननी झाली त्याच दिवशी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

अर्ज मागे घेण्यास गुरूवारपासून (१ जानेवारी) सुरूवात झाली. त्यानंतर भाजपाच्या आणखी दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक २७ अ मधून मंदा सुभाष पाटील, प्रभाग क्रमांक २४ ब मधून ज्योती पवन पाटील या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

धुळे महापालिकेमध्येही भाजपाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक १७ मधन सुरेखा उगले या विजयी झाल्या. भाजपाच्या उज्ज्वला भोसले या प्रभाग क्रमांक १ मधून बिनविरोध निवडल्या गेल्या. ज्योत्सना पाटील याही विजयी झाल्या आहेत.

जळगाव महापालिकेत भाजपाच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे याही बिनविरोध निवडून आल्या आहेत. भिवंडी महापालिकेत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमीत पाटील हे बिनविरोध निवडू आले आहेत.

पनवेलमध्येही भाजपाने अर्ज छाननीच्या दिवशीच एका जागेवर विजय मिळवला. प्रभाग क्रमांक १८ मधून नितीन पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत. शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झाला.

















