अबब! गणपतीच्या हातातील प्रसादाच्या लाडूचा लिलाव; खरेदीची किंमत पाहून डोळे दिपतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 03:18 PM2023-09-28T15:18:45+5:302023-09-28T15:22:41+5:30

आज २८ सप्टेंबर रोजी देशभरात अनंत चतुर्दशीनिमित्त लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. अनेक भाविकांनी गणपती बाप्पाचे विसर्जन केले. तेलंगणातही एका गणपती मंदिरात अनोखी परंपरा आजही जोपासली जाते.

तेलंगणा येथे हैदराबादच्या बाळापूर गणेशाच्या लाडूंचा लिलाव होतो. हा लाडू भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. २०२३ मध्ये हैदराबादमधील एका व्यक्तीने रेकॉर्डब्रेक रक्कम भरून हा लाडू त्याच्या घरी नेला आहे.

एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, बाळापूर येथील गणपतीच्या लाडूचा यंदाच्या वर्षी २७ लाख रुपयांना लिलाव करण्यात आला. तेलंगणातील हैदराबाद येथील दासरी दयानंद रेड्डी या गणेशभक्ताने लाखोंची किंमत देऊन हा लाडू आपल्या घरी नेला.

२०२२ मध्ये एका भक्ताने या लाडूसाठी २४.६० लाख रुपये दिले होते. यंदा एका गणेशभक्ताने २.४० लाख रुपये जास्त देऊन २७ लाखांना लाडू खरेदी केला. २०२१ मध्ये गणपतीच्या या लाडूचा लिलाव १८.९० लाख रुपयांना झाला होता.

ज्यानी हा लाडू खरेदी केला ते दयानंद रेड्डी म्हणाले की, 'मी २०२२ मध्ये लिलावात भाग घेतला होता पण खरेदी करू शकलो नाही. मला बाळापूर लाडू मिळाल्याने खूप आनंद झाला ज्याला बंगारू लाडू असेही म्हटलं जाते.

बाळापूर गणेश उत्सव समिती दरवर्षी या लाडूचा लिलाव आयोजित केला जातो. ही गणेश समिती १९९४ पासून लाडूचा लिलाव करत आहे. यंदा २०२३ मध्ये ३६ भाविकांनी बोली लावली होती. समितीने यावर्षी नवीन नियम लागू केला. पुढच्या वर्षीपासून लाडूची बोली लावणाऱ्यांना तिथेच पैसे भरावे लागतील.

१९९४ पासून मंदिर समिती या लाडूचा लिलाव करते. एका रिपोर्टनुसार, या लाडूचा १९९४ मध्ये ४५० रुपयांना लिलाव झाला होता. कोलन मोहन रेड्डी नावाच्या शेतकऱ्याने हा लाडू खरेदी केला होता. कुटुंबीय व ग्रामस्थांना प्रसाद दिल्यानंतर त्यांनी शेतात लाडूचे तुकडे टाकले. यानंतर त्यांचे नशीब पालटल्याचा अनुभव आहे.

ज्यावेळी कोलन मोहन रेड्डी यांनी त्यांच्या शेतात गणेश लाडूचे तुकडे फेकले तेव्हापासून त्यांच्या शेतातील उत्पन्न दुप्पट झाले. कोलन रेड्डी यांच्या अनुभवानंतर असं मानलं जाते की, ज्या व्यक्तीकडे हा लाडू येतो त्याचे नशीब बदलते.

हा लाडू ज्यांच्या हाती पडतो त्याचे नशीब, आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी येते असा स्थानिक लोकांचा विश्वास आहे. विसर्जनासाठी नेण्यापूर्वी लाडूचा लिलाव करण्यात येतो आला. दरम्यान, शहरात गणेशमूर्तींचे भव्य विसर्जन सुरू असून पोलिसांनी चोख बंदोबस्त आहे.

बाळापूर गणेश लाडूचे वजन सुमारे २१ किलो असते. २०२० मध्ये कोरोनामुळे बाळापूर गणेश लाडूचा लिलाव होऊ शकला नाही, त्यामुळे ते तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना देण्यात आले.