"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा

Sourav Ganguly on pitch controversy, IND vs SA: आफ्रिकेविरूद्ध भारताच्या कसोटी पराभवानंतर कोलकाताच्या पिचवर टीका केली जातेय

कोलकाता येथे झालेला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना अवघ्या ३ दिवसांतच संपला. दक्षिण आफ्रिकेने भारताला ३० धावांनी पराभूत केले. त्यानंतर खेळपट्टीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे.

भारताच्या मानहानीकारक पराभवात खेळपट्टीने मोठी भूमिका बजावली असे जाणकारांचे मत आहे. फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवून भारत स्वतःच्याच जाळ्यात अडकला. त्यामुळेच भारतीय संघ व्यवस्थापनावरही टीका होते आहे.

प्रशिक्षक गौतम गंभीरचा असा विश्वास आहे की खेळपट्टीमध्ये कोणताही दोष नव्हता. पण खेळपट्टीच्या वादात आता माजी भारतीय कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुलीने एक मोठा खुलासा केला आहे.

"खेळपट्टीचा पॅटर्न ठरवण्यापूर्वी माझ्याशी कुठलीही चर्चा झाली नव्हती. पिच निवडीत मी अजिबात सहभागी नव्हतो. बीसीसीआयचे क्युरेटर कसोटी सामन्याच्या चार दिवस आधी आले आणि त्यांनी खेळपट्ट्यांची जबाबदारी घेतली."

"आमच्याकडे आमचे स्वतःचे क्युरेटर (सुजन मुखर्जी) देखील आहेत. त्यांनी दीर्घकाळ उत्तम काम केले आहे. ज्याप्रकारे विनंती केली जाते तशाप्रकारचे पिच ते बनवून देतात. आम्ही कुठल्याही प्रकारे स्वत: यात सहभागी होत नाही."

"बीसीसीआयच्या क्युरेटरने बनवलेले पिच फारसे चांगले नव्हते. भारतीय संघाचे सलामीवीर आणि मधल्या फळीची फलंदाजी चांगल्या पिचवर खेळण्यास पात्र आहे," अशा शब्दांत गांगुलीने रोखठोक मत मांडले.