Flashback 2025: टेस्टमध्ये गिल; वनडेत स्मृती! T20I त मात्र लिंबू टिंबू संघातील पठ्ठ्यानं गाजवलं वर्ष

वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये यंदाचे वर्ष गाजवणारे खेळाडू, इथं पाहा खास रेकॉर्ड

टीम इंडितील प्रिन्स अर्थात शुभमन गिल याला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी मोठा धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपर्यंत टी-२० संघाचा उप कर्णधार असलेल्या गिलला टी-२० संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

टी-२० संघातून बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे वर्षाकाठी गिलला मोठा धक्का बसला असला तरी हे वर्ष त्याच्यासाठी खास राहिले आहे. कारण कसोटी पाठोपाठ वनडे संघाचे नेतृत्व त्याला मिळाले आहे.

२०२५ मध्ये कसोटीत त्याने आपली खास छापही सोडली. वर्षभरात ९ सामन्यातील १६ डावात त्याने ६५.५३ च्या सरासरीसह ९८३ धावा केल्या.

कसोटीत गिलच्या पाठोपाठ केएल राहुल १० सामन्यातील १९ डावात ८१३ धावांसह दुसऱ्या तर जो रुट ९ सामन्यातील १६ डावात ७९० धावांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.

यंदाच्या वर्षात वनडेत टीम इंडियाची क्वीन स्मृती मानधना हिने आपला दबदबा दाखवून दिला. भारतीय महिला संघाला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावताना ती पुरुष आणि महिला वनडेत सर्वाधिक धावा करण्यात अव्वलस्थानी राहिली.

स्मृती मानधना हिने यंदाच्या कॅलेंडर ईयरमध्ये २३ वनडे सामन्यातील २३ डावात १३६२ धावा केल्या आहेत. तिच्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेची लॉरा २१ सामन्यातील २० डावात ११७४ धावांसह दुसऱ्या स्थानावर राहिली.

यंदाच्या वर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताची प्रतिका रावलही पुरुष क्रिकेटर्सपेक्षा भारी ठरली. ती २१ सामन्यातील २० डावात ९३७ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरमध्ये अव्वल पाचमध्ये इंग्लंडचा जो रुट हा एकमेव पुरुष बॅटर आहे. त्याने यावर्षी १५ सामन्यातील १५ डावात ८०८ धावा केल्या आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून अभिषेक शर्मानं आपली खास छाप सोडली. पण यंदाच्या कॅलेंडर ईयरमध्ये क्रिकेट जगतात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सातव्या क्रमांकावर दिसतो. २१ आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यातील २१ डावात त्याने ८५९ धावा केल्या आहेत.

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २०२५ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रिया या लिंबू टिंबू संघातील करणबीर सिंहचा पहिला नंबर लागतो. या बॅटरनं २०२५ मध्ये ३२ सामन्यातील ३२ डावात १४७२ धावा केल्या आहेत.