जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा म्हणजे काय, जाणून घ्या एका क्लिकवर!

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) सोमवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अधिकृत घोषणा केली. 2 वर्ष चालणाऱ्या या स्पर्धेत अव्वल 9 संघांमध्ये एकूण 27 कसोटी मालिकेत 72 सामने होणार आहेत आणि त्यानंतर अव्वल दोन संघांमध्या जेतेपदाचा सामना होणार आहे.

1 ऑगस्ट 2019 पासून या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेनुसार अव्वल 9 संघ पुढील दोन वर्षांत होम-अवेय अशा प्रत्येकी तीन-तीन कसोटी मालिका खेळणार आहेत. अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे जेतेपदाचा सामना होईला आणि विजेत्या संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मान मिळेल

कसोटी क्रिकेटचा प्रसार व प्रचार होण्यासाठी ही नवीन संकल्पना मांडण्यात आली आहे. प्रत्येक मालिकेनंतर विजयी संघाला गुण मिळणार आहे. वन डे आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेप्रमाणेच ही स्पर्धा असणार आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल नऊ संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानुसार ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे संघ पात्र ठरले आहेत. ही स्पर्धा पुढील दोन वर्ष विविध देशांमध्ये खेळवण्यात येईल.

प्रत्येक मालिकेसाठी 120 गुण देण्यात येणार आहेत. जितक्या सामन्यांची मालिका त्यामुसार 120 गुणांची विभागणी प्रत्येक सामन्यासाठी होईल.

या स्पर्धेंतर्गत इंग्लंड 22 सामने खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( 19), भारत ( 18), दक्षिण आफ्रिका ( 16), वेस्ट इंडिज ( 15), न्यूझीलंड ( 14), बांगलादेश ( 14), पाकिस्तान ( 13) आणि श्रीलंका (13) यांचा क्रमांक येतो.