T20 World Cup 2021: अफगाणिस्तान नेमकं कोणत्या राष्ट्रध्वजासह टी-२० वर्ल्डकप खेळणार? तालिबाननं जाहीर केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 06:14 PM2021-09-23T18:14:23+5:302021-09-23T18:18:25+5:30

T20 World Cup 2021: टी-२० वर्ल्डकप स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून सुरू होतेय. यात अफगाणिस्तान संघाचाही समावेश आहे. पण तेथील सध्याची परिस्थिती पाहता संघ नेमका कोणत्या झेंड्याखाली खेळणार याबाबत साशंकता होती. आता त्याबाबत स्पष्टता आली आहे.

अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केलेला आहे. त्यामुळे सुरुवातीला टी-२० वर्ल्डकपमघ्ये अफगाणिस्तानच्या सहभागावर गंडांतर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण तसं झालं नाही. तालिबाननं नरमाईची भूमिका घेत अफगाणिस्तानचा संघ टी-२० वर्ल्डकप खेळणार असल्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान, तालिबाननं महिला क्रिकेटला विरोध केला आहे. अफगाणिस्तानचा पुरूष संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये यापुढील काळातही खेळताना दिसणार आहे. अवघ्या महिन्याभरात आयसीसीच्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत आहे.

दुबई आणि ओमानमध्ये खेळविण्यात येणाऱ्या या वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानला थेट प्रवेश मिळालेला आहे. आयसीसीनं कायमस्वरुपी सदस्यत्व अफगाणिस्तानला दिलेलं असल्यानं संघाला स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे.

अफगाणिस्तानात आता तालिबानी राजवट आली आहे. पण तालिबाननं अफगाणिस्तान क्रिकेटला विरोध केला असता तर आयसीसीचं मिळालेलं कायमस्वरुपी सदस्यत्व रद्द केलं जाईल याची कल्पना तालिबानला असल्यानं अफगाणिस्तानच्या संघाला तालिबाननं विरोध केलेला नाही.

तालिबाननं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी अझीझुल्लाह फाजली या आपल्या गटातील व्यक्तीची नुकतीच नियुक्ती केली आहे. फाजली यांनी कर्णधार मोहम्मद नाबीच्या नेतृत्त्वाखाली अफगाणिस्तान क्रिकेट संघ टी-२० वर्ल्डकप खेळणार असल्याचं जाहीर केलं आहे.

विशेष म्हणजे, अफगाणिस्तानचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानच्याच राष्ट्रीय ध्वजाखाली खेळणार आहे. त्यावर तालिबानी नेत्यांनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही. तालिबानी ध्वजाखाली अफगाणिस्तान स्पर्धेत सहभागी होईल अशी भूमिका तालिबाननं घेतली असती तर मोठा पेच निर्माण झाला असता.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणतीही सहमती न मिळालेल्या अशा ध्वजासह संघाला खेळू देणं आयसीसीसाठी शक्य नव्हतं. त्यामुळे तालिबाननं आडमूठी भूमिका घेतली असती तर अफगाणिस्तान क्रिकेटला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला गेला असता.

आयसीसीच्या प्रोटोकॉलनुसार प्रत्येक देशाला आयसीसीच्या स्पर्धेच्या आधीच आपल्या देशाचा राष्ट्रध्वज सादर करावा लागतो. यात कधी वाद निर्माण होण्याचा प्रसंग आजवर घडलेला नाही. पण अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती पाहता याबाबत विविध चर्चांना सुरुवात झाली होती.

तालिबाननं नियुक्त केलेल्या क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षानंच आता अफगाणिस्तानचा संघ राष्ट्रध्वजाच्याच माध्यमातून स्पर्धेत सहभागी होईल असं जाहीर केलेलं असल्यानं अफगाणिस्तानबाबतचा पेच संपुष्टात आलेला आहे.

अफगाणिस्तानला आयसीसीनं सदस्यत्व दिलेलं असल्यानं संघाला क्वालिफायर सामने न खेळताच थेट प्रवेश दिला गेला आहे. स्पर्धेत अफगाणिस्तानचा समावेश 'ब' गटात करण्यात आला असून यात भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे.